देहराडून : केदारनाथमध्ये पुन्हा पावसाने धुमाकूळ घातला असून गौरीकुंडमध्ये भूस्खलन होऊन दोन दुकाने जमीनदोस्त झाली आहेत. ही घटना शुक्रवारी (आज) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेत तब्बल 13 नागरिक दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टेकडीवरुन ढिगारा कोसळला त्यावेळी या दुकानात नागरिक झोपले होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली. घटनास्थळी एसडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य करण्यात येत आहे.
गौरीकुंडमध्ये भूस्खलन झाल्याने दोन दुकाने जमीनदोस्त दुकानात झोपले होते नागरिक :गौरीकुंड परिसरातील दुकानात नागरिक झोपले होते. मात्र गुरुवारी मध्यरात्री टेकडीचे अचानक भूस्खलन झाल्याने मोठा अपघात झाला. या ढिगाऱ्याखाली दोन दुकाने दबून गेली आहेत. या दुकानात तब्बल 13 नागरिक दबून बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या बेपत्ता नागरिकांमध्ये काही स्थानिक नागरिकांसह नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. गौरीकुंड आणि सोनप्रयाग परिसरात गुरुवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गौरीकुंड परिसरातील मंदाकिनी नदी दुथडी भरुन वाहत आहे. जोरदार पाऊस होत असल्याने टेकडीवरील दगड-माती घसरुन रस्त्यावर येत आहे. त्यामुळे या परिसरात मोठे अपघात होत आहेत.
नागरिक नदीत वाहून गेल्याची भीती :सध्या केदारनाथ यात्रा सुरू असून गौरीकुंड, सोनप्रयाग या परिसरात भाविकांची मोठी गर्दी आहे. मात्र गुरुवारी रात्रीपासून गौरीकुंड आणि सोनप्रयागमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या परिसरात टेकडीवरुन भूस्खलन होण्याचे प्रकार घडत आहेत. गौरीकुंड येथील टेकडीवरुन भूस्खलन झाल्यामुळे दोन दुकाने जमीनदोस्त झाली आहेत. या दुकानात झोपलेले नागरिक बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे हे नागरिक दुकानाला लागून असलेल्या मंदाकिनी नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
भूस्खलनामुळे कोसळलेला टेकडीची दगड-माती मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता :गौरीकुंडमध्येझालेल्याभूस्खलनामुळे 13 नागरिक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. मात्र पाऊस कोसळत असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे. सध्या बचावकार्य बंद असून पाऊस थांबल्यानंतरच बचावकार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एसडीआरएफकडून देण्यात आली आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. गौरीकुंड आणि सोनप्रयाग या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. गौरीकुंड परिसरात झालेल्या अपघातामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.