बंगळुरू :देशाच्या स्वातंत्र्य दिनामुळे या आठवड्यात सलग सुट्टया आल्या आहेत. त्यामुळे अधिकारी आणि नोकरदार मंडळी पर्यटनस्थळाकडे धाव घेत आहेत. मात्र कर्नाटकच्या एका सनदी अधिकाऱ्यांनी सलग सुट्टयांचा उपयोग करण्यासाठी चक्क गुराखी होऊन गुरे चारल्याची घटना कलबुर्गी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. आशप्पा पुजारी असे त्या सनदी अधिकाऱ्यांचे नाव असून ते सेदाम उपविभागात सहायक आयुक्त पदावर कार्यरत आहेत. आशप्पा यांनी सुट्टीच्या दिवशी रेवणसिद्धेश्वर मंदिर प्रशासनातील 300 गुरे चारून एक आदर्श निर्माण केला आहे.
रेवणसिद्धेश्वर गुड्डा मंदिराचे प्रशासक :काळगी तालुक्यातील राटकळ गावातील रेवणसिद्धेश्वर मंदिर हे धार्मिकदृष्ट्या महत्वाचे आहे. या मंदिराची प्रशासकीय जबाबदारी प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे मंदिरावर प्रशासक म्हणून आशप्पा पुजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या स्वातंत्र्य दिनामुळे सलग सुट्टया आल्या आहेत. त्यामुळे आशप्पा यांनी शुक्रवारी रात्री मंदिरात तळ ठोकला. त्यानंतर त्यांनी मंदिर प्रशासनाचा आढावा घेतला.रेवणसिद्धेश्वर मंदिराचे प्रशासक असलेल्या आशप्पा पुजारी यांनी शनिवारी सकाळीच मंदिर प्रशासनाचे असलेले 300 गुरे चारण्यासाठी जंगलात नेले. राटकळ या गावात वनविभागाची 326 एकर डोंगराळ जमीन आहे. या डोंगरात गुरे चारत त्यांना हिरवा चारा घातला. तब्बल 300 गुरांना राखत त्यांनी गुराखी म्हणून सेवा बजावली.
वनविभागाच्या जमीनीवर अतिक्रमण : रेवणसिद्धेश्वर मंदिर प्रशासनाने 300 गुरांच्या देखभालीसाठी 7 गुराख्यांची नेमणूक केली आहे. मात्र तरीही मंदिर प्रशासनाच्या गुरांची प्रकृती खराब होऊन मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे सनदी अधिकारी आशप्पा यांनी रोज या गुरांना डोंगरावर चारण्यास नेण्याची गुराख्यांना तंबी दिली. मात्र वनविभागाच्या 326 एकर जमीनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात येत असून अतिक्रमण धारक गुरे चारण्यास मनाई करत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. त्यामुळे आशप्पा पुजारी यांनी गुरे डांगरावर नेऊन चारली, अशी माहिती नागरिकांनी दिली.
तरुणांसाठी प्रेरणादायी काम, गावकऱ्यांनी केले कौतुक : शेतकरी कुटुंबात वाढलेले कर्नाटकचे सनदी अधिकारी आशप्पा पुजारी यांना गुरांच्या समस्येची जाणीव आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने गुरांची काळजी घेणे हे कौतुकास्पद आहे. काही अधिकारी फक्त एसीत बसून दिवस काढतात. मात्र, काही अधिकारी असे डोंगराळ परिसरातील हवेत गुरे चरत इतरांसाठी आदर्श निर्माण करत असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. गुरांवर आशप्पा पुजारी यांचे नितांत प्रेम असल्याचे गावातील युवानेते रेवणसिद्ध बडा यांनी सांगितले. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असे आवाहनही बडा यांनी यावेळी केले. आशप्पा पुजारी यांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी आशप्पा पुजारी यांनी तरुणांना आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी गायींना चारापाणी करण्यासह त्यांची सेवा करण्याची संधी देणार असल्याचेही सांगितले.