जयपूर : करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांचे सोमवारी रात्री उशिरा जयपूरमधील एसएमएस हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कालवी साहेब या नावाने प्रसिद्ध असलेल्या लोकेंद्र सिंह यांच्यावर ब्रेन स्ट्रोकमुळे जून 2022 पासून उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी नागौर जिल्ह्यातील कालवी या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राजकारणातही नशीब आजमावले : लोकेंद्र सिंह कालवी यांनी समाजाबरोबरच राजकारणातही नशीब आजमावले होते. 2003 मध्ये त्यांनी देवी सिंह भाटी या भाजपमधून फुटलेल्या नेत्यासोबत सामाजिक न्याय मंचची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी 2003 मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकही सामाजिक न्याय मंचच्या बॅनरखाली लढवली होती. मात्र, त्यांच्या पक्षाला केवळ एकच जागा जिंकता आली. लोकेंद्र सिंह राजस्थान विधानसभा निवडणूक 2008 पूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले होते. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षात प्रवेश केला. मात्र, नंतर सामाजिक व्यासपीठावर सक्रिय झाल्यानंतर ते सक्रिय राजकारणापासून दूर झाले.
वसुंधरा राजे यांचे कट्टर विरोधक :लोकेंद्र सिंह कालवी यांनी 2006 मध्ये भारतातील जाती आधारित आरक्षणाला विरोध करण्यासाठी श्री राजपूत करणी सेनेची स्थापना केली. ते माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे कट्टर विरोधकही मानले जात होते. राजे यांच्या पहिल्या कार्यकाळात कालवी यांनी सरकारच्या अनेक धोरणांविरोधात यशस्वी निदर्शने केली होती. कालवी यांनी भारतातील जातीवर आधारित आरक्षण व्यवस्थेला विरोध करून एका नव्या वादाला जन्म दिला होता. आपल्या आयुष्यातील बहुतांश काळ त्यांनी फाल्गुनी राजपूत समाजाचे नेतृत्व केले आणि समाजाच्या प्रतिष्ठेशी संबंधित मुद्दे विविध मंचांवर जोरदारपणे मांडले.