विजयपुरा (कर्नाटक) Karnataka News : कर्नाटकातील विजयपुरा येथील एका खासगी गोदामात सोमवारी (4 डिसेंबर) रात्री बिहारमधील 10 हून अधिक कामगार मक्यानं भरलेल्या पोत्यांखाली अडकले आहेत. यापैकी सात कामगारांचा मृत्यू झाला असून घटनास्थळावरून तीन कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यापूर्वी अडकलेल्या कामगारांपैकी तिघांची सुटका करण्यात आली होती. तसंच त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. दरम्यान, राजगुरू इंडस्ट्रीज येथे अन्न प्रक्रिया युनिटमध्ये कामगार काम करत असताना ही घटना घडली. त्यामुळं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
हा अत्यंत दुर्दैवी अपघात आहे. या घटनेत बिहारमधील सात कामगारांचा मृत्यू झालाय. इतर अडकलेल्या कामगारांना वाचवण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत तीन कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलंय- एम बी पाटील, मंत्री, कर्नाटक
कर्नाटकचे मंत्री घटनास्थळी दाखल :पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मक्याचे पोते असलेल्या स्टोरेज युनिटचे अनेक संच कोसळल्यानं कामगार अडकले होते. राजेश मुखिया (25), रामब्रीझ मुखिया (29) आणि शंभू मुखिया (26) अशी मृत कामगारांची नावं असून कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कर्नाटकचे मंत्री एमय बीय पाटील हे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत.