बेंगळुरू : रविवारी कर्नाटकच्या नोकरशाही वर्तुळात मोठी उलथापालथ घडली. आयपीएस अधिकारी डी रूपा मौदगील आणि आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्यातील वाद उघडपणे समोर आला. आयपीएस मौदगील यांनी रोहिणी सिंधुरी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्याच्या एका दिवसानंतर, त्यांनी काही छायाचित्रे प्रसिद्ध केली. या मध्ये रूपा मौदगील यांनी दावा केला आहे की, ही छायाचित्रे सिंधुरी यांनी 3 पुरुष आयएएस अधिकाऱ्यांना पाठवली होती. रुपा मौदगील यांनी शनिवारी सिंधुरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे १९ आरोप केले होते.
कायदेशीर कारवाईची धमकी : एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रोहिणी सिंधुरी यांनी रविवारी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, रूपा मौदगील ह्या त्यांच्या विरोधात खोटी आणि वैयक्तिक निंदा मोहीम चालवत आहेत. ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. रोहिणी सिंधुरी म्हणाल्या की, 'त्यांच्या कृत्यांबद्दल मी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली योग्य अधिकाऱ्यांमार्फत कायदेशीर कारवाई करेल. रोहिणी सिंधुरी म्हणाल्या की, रूपा यांनी माझी बदनामी करण्यासाठी माझ्या सोशल मीडियावरून फोटो आणि माझ्या व्हॉट्सअॅप स्टेटसचे स्क्रीनशॉट्स गोळा केले. सिंधुरी म्हणाल्या की, त्यांच्यावर आरोप होत असल्याने मी ही छायाचित्रे काही अधिकाऱ्यांना पाठवली आहेत. ती नावे जाहीर करावीत असा माझा आग्रह आहे.