बेंगळुरू :कर्नाटक उच्च न्यायालयाने बलात्काराचा आरोप असलेल्या एका व्यक्तीवरील फौजदारी कारवाई रद्द केली आहे. आरोपीने आणि पीडिताने लग्न केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. या जोडप्याला केस प्रलंबित असताना एक मूलही होते.
पीडिता सज्ञान आहे :न्यायमूर्ती के. नटराजन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पोक्सो आणि आयपीसी कलमांखालील बलात्काराचे आरोप रद्द करण्याच्या याचिकेवर विचार करताना सोमवारी हा निकाल दिला. मुलाचे आणि आईचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. पीडिता आता सज्ञान असून ती स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास आणि जीवनसाथी निवडण्यास सक्षम आहे, अशी टिप्पणी खंडपीठाने केली आहे. तिने आरोपीशी लग्न केले होते आणि तिला एक मुलगाही झाला होता.
पीडितेची खटला रद्द करण्यास मान्यता : पीडितेने देखील आरोपीविरुद्धचा खटला रद्द करण्याचे मान्य केले आहे, असे खंडपीठाने सांगितले. पीडित, बालक आणि त्यांचे भवितव्य यांचे हित लक्षात घेऊन आरोपीविरुद्धचा पॉक्सो खटला रद्द करणे योग्य आहे, असे न्यायालयाने नमूद केले. पीडित मुलीच्या वडिलांनी 27 जानेवारी 2021 रोजी आरेकेरे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, मुलगी आजीच्या घरी गेली असताना ती बेपत्ता झाली. ही मुलगी नंतर आरोपीसोबत सापडली. पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो आणि आयपीसी कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.