बेंगलुरु (कर्नाटक) : राज्यात निवडणुक जाहीर झाल्यापासून पक्ष एकमेकांवर सातत्याने आरोप करत आहेत. याच दरम्यान, काँग्रेसने भाजप नेत्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. शनिवारी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर हे आरोप केले आहेत. चित्तापूरमधील भाजप उमेदवाराने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हत्येचा कट रचल्याचा काँग्रेसचा दावा आहे. ते म्हणाले की, भाजपचे नेते पंतप्रधानांचे लाडके आहेत.
भाजप आता कर्नाटकात पुन्हा सत्तेत येणार नाही : याच पत्रकार परिषदेत सुरजेवाला यांनी कन्नड भाषेतील ऑडिओ रेकॉर्डिंगही सर्वांना ऐकवले. या ऑडिओमध्ये चित्तापूरमधील भाजप उमेदवाराचा आवाज असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. रणदीप सुरजेवाला म्हणाले की, याआधीही भाजपच्या एका नेत्याने म्हटले होते की, खर्गे 81 वर्षांचे आहेत, देव त्यांना कधीही बोलावू शकतो. आता हे रेकॉर्डिंग समोर आले आहे. यापेक्षा घसरलेले राजकारण असु शकत नाही, असेही ते म्हणाले आहेत. ते म्हणाले की, भाजप आता कर्नाटकात पुन्हा सत्तेत येणार नाही हे कळून चुकले आहे. त्यामुळे त्यांचे नेते या पातळीवर गेले आहेत असही ते म्हणाले आहेत.