नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाकट वाद पेटला असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ( Issue of Maharashtra Karnataka border dispute ) अद्यापही आक्रमक भूमिकाच घेतली आहे. आमच्या भूमिकेत कोणताही बदल नाही, सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढणार असल्याचे त्यांनी ( legal battle will be fought in Supreme Court ) ट्विट केले आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चादेखील केली आहे.
महाराष्ट्राच्या वाहनांवर कर्नाटकमध्ये दगडफेक झाली. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर बोलताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. महाराष्ट्रातून येणार्या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले आहे. ( maharashtra karnataka border dispute )
डरपोक सरकार : महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सातत्याने महाराष्ट्र सरकारला आव्हान देत आहेत. सरकारकडून यावर प्रतिक्रिया दिली जात नसल्याने महाराष्ट्र्रातील विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई बेळगावचा दौरा करणार होते. कर्नाटक सरकारने येऊ नये, अशी उघडपणे धमकी दिली. तसेच सीमेवर पोलीस बंदोबस्त वाढवला. यामुळे मंत्र्यांनी दौरा लांबणीवर टाकला. महाराष्ट्र सरकार डरपोक असल्याची खरमरीत टीका, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी केली.
सीमा भागातील परिस्थिती गंभीर झाल्याचा आरोप :राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हटले, कीमहाराष्ट्राने संयम पाळला आहे. मात्र त्यालाही मर्यादा आहेत. येत्या 24 तासात हल्ले थांबले नाहीत तर आमचाहीही संयम सुटू शकतो, असा खणखणीत इशाराही पवार यांनी कर्नाटकला दिला. तसेच बोम्मईंच्या वक्तव्यामुळे सीमा भागातील परिस्थिती गंभीर झाल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्राने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, असे स्पष्ट मतही पवारांनी मांडले. कोणी कायदा हातात घेतला तर त्याला केंद्र सरकार जबाबदार असेल असेही पवार म्हणाले.