बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी महिनाभर प्रचार केल्यानंतर आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. आज विविध पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) मध्ये बंद होणार आहे. यानंतर कर्नाटकात भारतीय जनता पक्ष सत्तेचा मुकुट टिकवणार की काँग्रेस सत्ता हिसकावून घेणार याबाबत 13 मे रोजी फैसला होणार आहे. सध्या तिसऱ्या क्रमांकावरील जनता दलाला (धर्मनिरपेक्ष) या निवडणुकीत किती यश मिळेल, याबाबतही 13 मे रोजीच कळणार आहे. दरम्यान सकाळी 11 वाजतापर्यंत 20.99 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
मतदार ठरवणार उमेदवारांचे भविष्य :कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील 224 विधानसभा मतदार संघांसाठी आज राज्यातील जनता आपले प्रतिनिधी निवडणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. राज्यभरातील 58 हजार 545 मतदान केंद्रांवर एकूण 5 कोटी 31 लाख 33 हजार 054 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हे मतदार 2 हजार 615 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
असा आहे मतदारांचा लेखाजोखा :कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानात तब्बल 2 कोटी 67 लाख 28 हजार 053 पुरुष, 2 कोटी 64 लाख 074 महिला आणि 4 हजार 927 इतर मतदार आहेत. उमेदवारांमध्ये 2 हजार 430 पुरुष, 184 महिला आणि एक उमेदवार तृतीयपंथी आहे. राज्यात 11 लाख 71 हजार 558 तरुण मतदार आहेत, तर 5 लाख 71 हजार 281 शारीरिकदृष्ट्या अपंग मतदार आहेत. तर 12 लाख 15 हजार 920 मतदार 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन सत्ताधारी भाजप 38 वर्षांची परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. यात राज्यातील जनतेने कोणत्याही सत्ताधारी पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्याचे टाळले आहे.
सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस आमने सामने :आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने दक्षिणेचा हा बालेकिल्ला राखण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात 18 जाहीर सभा आणि अर्धा डझनहून अधिक रोड शो करून जनतेचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसने पूर्ण ताकद लावली आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे.
त्रिशंकू जनादेश आल्यास सरकार स्थापनेची चावी जेडीएसकडे :काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी राज्यभर जाहीर सभा घेतल्या. राहुल आणि प्रियांकाने अनेक रोड शोही केले. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी प्रचारात कोणतीही कसर सोडली नाही. तथापि, या दोन पक्षांव्यतिरिक्त, सर्वांच्या नजरा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (सेक्युलर) वर आहेत. त्रिशंकू जनादेश आल्यास सरकार स्थापनेची चावी त्यांच्याच हाती असेल, असे जाणकारांचे मत आहे. यापूर्वीच्या निवडणुकीतही राज्यात अनेकवेळा हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पूर्ण बहुमताने सरकारचा नारा दिला.