Karnataka Election Result : कर्नाटकातील निकालावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया ; जयराम रमेश म्हणाले - जनतेने मोदींना नाकारले - कर्नाटक निवडणूक 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 113 चा जादुई आकडा पार केला आहे. काँग्रेस आता राज्यात बहुमताचे सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी हा पराभव थेट पंतप्रधानांचा पराभव असल्याचे म्हटले आहे. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपला पराभव स्वीकारला आहे.
कर्नाटक निवडणूक निकाल प्रतिक्रिया
By
Published : May 13, 2023, 4:09 PM IST
कर्नाटकातील भाजपच्या पराभवावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली :कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेसने राज्यात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. हा दावा आता खरा ठरतो आहे. काँग्रेसच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. मतमोजणीनुसार, काँग्रेसने 113 चा जादूई आकडा पार करत कर्नाटकात स्वबळावर सरकार स्थापन केले आहे. आता यावर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
जनतेने मोदींना नाकारले : कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयावर जयराम रमेश म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक प्रचाराचे रूपांतर पंतप्रधान मोदींच्या जनमत चाचणीत केले होते. परंतु त्याचा प्रयत्न जनतेने नाकारला. त्यांनी ट्विट केले की, 'कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकली आणि पंतप्रधान हरले हे निश्चित झाले आहे. भाजपने आपल्या निवडणूक प्रचाराचे रूपांतर पंतप्रधानांच्या सार्वमतामध्ये आणि राज्यात त्यांना 'आशीर्वाद' मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले होते. मात्र जनतेद्वारे ते नाकारण्यात आले आहे.' काँग्रेस पक्षाने लोकांचे जीवनमान, अन्न सुरक्षा, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजपुरवठा, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली, असा दावा रमेश यांनी केला.
भाजपने स्वीकारला पराभव : कर्नाटकात भाजपच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पराभव स्वीकारला आहे. बोम्मई म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्ष पुनरागमन करेल. ते म्हणाले की आम्ही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलो नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, संपूर्ण निकाल आल्यानंतर पक्ष विश्लेषण करेल आणि राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून आम्ही विविध स्तरांवर आमच्या उणिवा पाहू आणि त्या दुरुस्त करू.
'काँग्रेसचा विजय, जनतेचा विजय' : कर्नाटकातील विजयावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, जनतेने भाजपच्या वाईट प्रशासना विरोधात मतदान केले. सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना खरगे म्हणाले की, लोकांनी एकजुटीने काँग्रेसला मतदान केले आहे. प्रचारात पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी असूनही आणि प्रचंड निवडणूक यंत्रणा वापरूनही भाजपला जनतेला फसवता आले नाही, असेही ते म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते जफर इस्लाम यांच्याशी ईटीव्ही भारतची खास बातचीत
'विजयाचा आढावा घेतला जातो, पराभवाचाही होणार':भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सय्यद जफर इस्लाम म्हणाले की, 'भाजपने प्रत्येक निवडणूक खंबीरपणे लढवली आहे. या निवडणुकीतही पक्षाला जेवढी ताकद लावायची गरज होती, तेवढी आम्ही लावली होती. जसा आम्ही जिंकण्याचा आढावा घेतो तसाच पराभवाचा आढावा देखील घेऊ. आम्ही आमच्या उणीव भरून काढू आणि आगामी लोकसभा निवडणुकीत 100 टक्के विजय मिळवू.
'कर्नाटक विजयाची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होईल' : राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी ट्विट केले की, 'राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत जे वातावरण कर्नाटकात दिसले होते, त्याचे परिणाम आज कर्नाटक निवडणुकीच्या निकालात स्पष्टपणे दिसत आहेत. कर्नाटकाने जातीयवादी राजकारण नाकारून विकासाचे राजकारण निवडले आहे. याचीच पुनरावृत्ती आगामी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही होणार आहे.