बंगळुरू : कर्नाटक विधानसभा मतदार संघाची निवडणूक बुधवारी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळेल, असा दावा विविध एक्झिट पोलने केला आहे. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक्झिट पोलचे निकाल शंभर टक्के बरोबर नसतात. त्यामुळे एक्झिट पोलमधून काहीही दावा केला, तरी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळेल, असा विश्वास कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला. जनतेने भाजपच्या डबल इंजिनच्या सरकारवर विश्वास ठेऊन मतदान केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मतदारांनी दिली भाजपला पसंती :कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपचे नेते विजयाबाबत दावे प्रतिदावे करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना याबाबत विचारले असता, त्यांनी भाजपने कर्नाटकमध्ये विकास केला आहे. राज्याला पुढे नेण्याचे काम भाजपच्या डबल इंजिनच्या सरकारने केले आहे. त्यामुळे काही प्रतिस्पर्धी नेते दावा करत आहेत, मात्र मतदारांनी नेहमीच भाजपला पसंती दिली आहे. काँग्रेसला मतदारांनी या निवडणुकीत नाकारल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
एक्झीट पोल 100 टक्के बरोबर नसतात :कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 च्या निवडणुकीत एक्झिट पोलने काँग्रेसला बहुमत दाखवले आहे. त्यामुळे भाजपला एक्झिट पोलमध्ये सत्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट होत असल्याबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारले. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक्झिट पोल कधीच 100 टक्के बरोबर नसतात. निकालानंतर संपूर्ण परिस्थिती बदलू शकेल, अशी तफावत असेल, असेही बसवराज बोम्मई यांनी यावेळी स्पष्ट केले. बसवराज बोम्मई हे शिगगाव येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.
आम्ही पूर्ण बहुमताने जिंकणार :आम्ही पूर्ण बहुमताने जिंकणार असल्याचे आमच्या ग्राउंड रिपोर्टमधून स्पष्ट होत आहे. आपण 13 मेपर्यंत निकालाची वाट पाहू, असेही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले. काँग्रेसला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिल्याच्या प्रश्नावर बसवराज बोम्मई यांनी जोरदार पलटवार केला. अधिक संख्येने मतदार मतदानासाठी येणे हे भाजपसाठी केव्हाही चांगले असते, काँग्रेससाठी नाही. शहरी भागातील मतदारही मतदानासाठी आले आहेत, त्यांनी भाजपला मतदान केल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला आहे.