बंगळुरू :कर्नाटकात 10 मेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात रंगलेल्या भाजप, काँग्रेस आणि जेडी (एस) पक्षातील उमेदवार छुप्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापांसून राजकीय पक्षांचे प्रमुख नेते राज्याच्या विविध भागात झंझावाती दौऱ्यावर आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आपला बालेकिल्ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर काँग्रेसनेही सत्ता खेचून आणण्यासाठी जोर लावला आहे.
जेडीएस किंगमेकर नाही, तर सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात :भाजपने आपली सत्ता वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे काँग्रेस पक्ष भाजपकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी आतुरला आहे. काँग्रेस 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मुख्य विरोधी पक्ष म्हणून आपले स्थान मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. तर माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली जनता दल (धर्मनिरपेक्ष) निवडणूक प्रचारात आपली सर्व शक्ती पणाला लावताना दिसत आहे. जेडीएस निवडणुकीत 'किंगमेकर' नव्हे तर विजेता म्हणून उदयास येण्याची इच्छा राखून आहे. भाजपच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी मोठा जोर लावताना दिसून येत आहेत.
कर्नाटकच्या निवडणुकीत देशाचे मुद्दे :कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराची धुरा स्थानिक नेत्यांच्या हातात होती. त्यानंतर मात्र काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांच्यासारखे प्रमुख नेतेही निवडणूक प्रचारात सहभागी झाले. जेडीएसदेखील निवडणूक प्रचारात स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य देत आहे. त्यांचे नेते एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत एचडी देवेगौडाही प्रचार करत आहेत.
पंतप्रधान मोदींनी घेतल्या तब्बल 18 सभा :कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 एप्रिलपासून तब्बल 18 जाहीर सभा आणि सहा रोड शो केले आहेत. 29 मार्चला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जानेवारीपासून आतापर्यंत सात वेळा राज्याचा दौरा केला आहे. यात त्यांनी विविध सरकारी योजनांसह अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी झालेल्या अनेक बैठकांनाही त्यांनी संबोधित केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्याच्या दौऱ्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला असून त्यामुळे पक्षाला भरघोस मते मिळण्याची आशा भाजपला निर्माण झाली आहे.