बेंगळुरू : भाजपने आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी व्हिजन डॉक्युमेंट (संकल्प पत्र) जारी केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर म्हटले की, 'कर्नाटकचा जाहीरनामा वातानुकूलित खोलीत बसून बनवण्यात आलेला नाही, तर यासाठी कार्यकर्त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, केंद्रीय खाण, कोळसा आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, कर्नाटक भाजपचे अध्यक्ष नलिंकुमार कटील आदी उपस्थित होते.
भाजपने संकल्प पत्रामध्ये केलेल्या घोषणा : संकल्प पत्रामध्ये कर्नाटकात उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशींवर आधारित समान नागरी संहिता (UCC) लागू करण्यात आली आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात अटल आहार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना अर्धा लिटर नंदिनी दूध, पाच किलो तांदूळ आणि पाच किलो भरड धान्य देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. गरजू लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याज सवलत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेजही जाहीर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना बियाणांसाठी 10 हजार रुपये देऊ करण्यात आले आहेत. यासोबतच कर्नाटक अपार्टमेंट ओनरशिप अॅक्ट, 1972 मध्ये सुधारणांचा समावेश करण्यात आला आहे. बेंगळुरूमधील अपार्टमेंट रहिवाशांना सुविधा देण्यासाठी कर्नाटक रहिवासी कल्याण सल्लागार समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. यासोबतच उगादी, गणेश चतुर्थी आणि दिवाळीदरम्यान बीपीएल कार्डधारकांना मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले गेले आहे. पक्षाने शहरी भागात 5 लाख आणि ग्रामीण भागात 10 लाख घरे बांधण्याची घोषणा केली आहे.