लडाख : पाकिस्तानने कारगिलमध्ये केलेल्या भ्याड हल्ल्याला भारत मातेच्या सुपूत्रांनी चोख उत्तर देत हुसकावून लावले. मात्र कारगिल युद्धात अनेक भारतीय जवानांना पाकिस्तानचा हल्ला परतवून लावताना वीर मरण पत्करावे लागले. देशाच्या या शूर जवानांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी कारगिल विजय दिन आयोजित करण्यात येतो. आज राजनाथ सिंह यांनी कारगिल येथे शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कारगिलच्या युद्ध स्मारकावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुष्पहार अर्पण केला.
जवानांनी शत्रूंच्या छातीवर फडकवला तिरंगा :लडाखमध्ये भारताच्या रक्षणासाठी देशाच्या जवानांनी 1999 मध्ये दाखवलेले शौर्य सुवर्णाक्षरांनी लिहिले आहे. आज आपण आपल्या जवानांमुळेच मोकळा श्वास घेऊ शकतो. शून्य डिग्रीपेक्षा कमी तापमानात ऑक्सिजनची कमतरता असतानाही आपल्या सैनिकांनी कधीही बंदुका खाली केल्या नाहीत. 1999 मध्ये भारताच्या सैनिकांनी आपल्या शौर्य गाजवत शत्रूंच्या छातीवर तिरंगा फडकवला होता. त्यामुळेच आज कारगिलमध्ये भारताचा ध्वज मानाने फडकत असल्याचेही राजनाथ सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले. कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 1999 च्या कारगिल युद्धात पाकिस्तानवर भारताच्या विजयासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. हा दिवस भारताच्या अतुलनीय योद्धांच्या शौर्याला समोर आणतो जे नेहमीच देशातील लोकांसाठी प्रेरणास्थान राहतील, असे पंतप्रधानांनी हिंदीत ट्विटमध्ये म्हटले आहे.