बंगळुरू :कर्नाटकच्या बेळगावी येथे आज कर्नाटक रक्षण वेदिके (करवे) आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला. अगोदर शिवसेना पदाधिकाऱ्याच्या गाडीवर व रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली होती. त्याला शिवसेनेने प्रत्युत्तर दिल्यानंतर आता करवे कार्यकर्त्यांनी पुन्हा मराठी फलकांना काळे फासल्याची घटना समोर आली आहे.
पुणे-बंगळुरू महामार्गावर असणाऱ्या मराठी हॉटेलच्या पाट्यांना या कार्यकर्त्यांनी काळे फासले. तसेच हॉटेल चालकांना मराठी फलक न वापरण्याची ताकीदही या कार्यकर्त्यांनी दिली. यावेळी कित्येक मराठी फलक फेकूनही देण्यात आले. यासोबतच त्यांनी रस्त्यावर असणाऱ्या मराठी पाट्यांवरही या कार्यकर्त्यांनी शाई फासली.