नवी दिल्ली - जेएनयू देशद्रोह खटल्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) नेते आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार, माजी विद्यार्थी उमर खालिद, अनिर्बन भट्टाचार्य यांच्यासह एकूण 10 आरोपी आहेत. कन्हैया, उमर आणि अनिर्बान आधीच जामिनावर आहेत. सोमवारी उर्वरित आरोपींच्या वकिलांनीही जामिनासाठी अर्ज केला होता. आज न्यायालयाने 25,000 रुपयांच्या जातमुचलक्यांवर जामीन मंजूर केला. चसेच आरोपींना चार्जशीट व इतर कागदपत्रे देण्याचे निर्देशही कोर्टाने दिल्ली पोलिसांना दिले. कोर्टाने कागदपत्रांच्या छाननीसाठी 7 एप्रिलची तारीख निश्चित केली.
मुख्य मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी (सीएमएम) यांनी सुमारे एका महिन्यापूर्वी दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली होती. यानंतर सर्व आरोपींना 15 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. सर्व आरोपींवर जेएनयू कॅम्पसमध्ये भारतविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे.
या 10 जणांविरोधात दाखल केले होते आरोपपत्र
- कन्हैया कुमार
- उमर खालिद
- अनिर्बान भट्टाचार्य
- आकिब हुसैन
- मुजीब हुसैन
- मुनीब हुसैन
- उमर गुल
- रईया रसूल
- बशीर भट
- बशारत अली
काय प्रकरण ?
जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील एका कार्यक्रमामध्ये 9 फेब्रुवारी 2016 ला कन्हैया कुमारने कथित देशविरोधी घोषणा दिल्या होत्या, असा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. पुराव्याचा अभाव असल्यामुळे त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. कन्हैयाने त्याच्या विरुद्धचे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.