चंदीगड (पंजाब) :बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला मानहानीच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. आता कंगनाला 14 जुलैला भटिंडा कोर्टात हजर राहावे लागणार ( Kangana Ranaut Defamation Case ) नाही. खरे तर कंगनाने पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात तिच्यावरील मानहानीचा खटला रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने सोमवारी खालच्या कोर्टाला आदेश दिला की, पुढील सुनावणी जोपर्यंत हायकोर्टात होत नाही तोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी करू नये.
कृषी कायद्याबाबत केली होती पोस्ट -पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ सप्टेंबर रोजी होणार आहे. आता कंगनाला येत्या १४ जुलै रोजी भटिंडा जिल्हा न्यायालयात हजर राहावे लागणार नाही. कंगनाचे वकील अभिनव सूद यांनी कंगनावरील मानहानीचा खटला फेटाळण्यात यावा, असे म्हटले आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनादरम्यान कंगना रणौतने भटिंडाच्या मोहिंदर कौरचा फोटो पोस्ट केला होता.