चेन्नई -अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकींचा निकाल लागला असून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. बायडेन राष्ट्राध्यक्षपदी तर भारतीय-अमेरिकी वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतील. कमला हॅरिस यांच्या विजयानंतर भारतातील तामिळनाडूच्या थुलसेंद्रपुरमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी दारासमोर रांगोळ्या काढल्या असून कमला हॅरिस यांच्या मामांनीही आनंद व्यक्त केला आहे. कमला यांचा विजय होणार, याबद्दल मला खात्री होती. मी फक्त अंतिम निकालाची वाट पाहत होतो, असे ते म्हणाले.
कमला हॅरिस यांचा विजय झाल्यावर राज्यमंत्री आर. कामाराज यांनी थुलसेंद्रपुरमधील मंदिरात प्रार्थना केली. थुलसेंद्रपुरमधील हे कमला यांच्या आजोबांचे (आईचे वडिल) मूळ गाव आहे. गावकऱ्यांनी आतषबाजी करत कमला यांचा विजय साजरा केला. रस्त्यांवर पोस्टर लावून आणि फटाके फोडून हा जल्लोष साजरा करण्यात आला आहे. निकालापूर्वी कमला यांच्या विजयासाठी तामिळनाडूतील मूळ गावी प्रार्थनेचे आयोजन करण्यात आल्याचे बालचंद्रन यांनी सांगितले होते.