हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता आज दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाल्या. त्या काल बेगमपेट विमानतळावरून एका विशेष विमानाने राष्ट्रीय राजधानीकडे रवाना झाल्या होत्या. त्यांच्यासोबत राज्यमंत्री आणि त्यांचे भाऊ केटी रामाराव आणि खासदार संतोष कुमार होते. कविता यांनी या आधी या प्रकरणी 16 मार्चला ईडीसमोर हजर राहण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवले होते.
एजन्सीला लिहिले होते पत्र : दिल्लीत ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर होण्याच्या काही तास आधी त्यांनी एजन्सीला पत्र लिहिले होते की त्या वैयक्तिकरित्या या तपासात सहभागी होणार नाहीत. त्यांनी बीआरआस सरचिटणीस सोमा भरत कुमार यांना त्यांच्या वतीने ईडीसमोर हजर राहण्यासाठी अधिकृत केले होते. के. कविता म्हणाल्या होत्या की, त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले नसल्याने त्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत हजर होत आहेत. कविता यांनी असेही लिहिले होते की, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका 24 मार्च रोजी सूचीबद्ध असल्याने ईडीने जारी केलेल्या समन्सबाबत पुढील कारवाईपूर्वी निकालाची प्रतीक्षा करावी.