अहमदाबाद :गुजरातमधील सरकारी कर्मचाऱ्यांना आता जिओ वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. गुजरात सरकारने वोडाफोन, आयडियाची सेवा बंद केली आहे. त्यामुळे या सगळ्या कर्मचाऱ्यांचे क्रमांक जिओमध्ये वळवण्यात आले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना 37.50 रुपयांमध्ये रिलायन्स जिओ मासिक भाडे योजना मिळणार आहे. या प्लॅनद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही मोबाइल ऑपरेटर, लँडलाइनवर मोफत कॉलिंग करता येईल. यासोबतच यूजरला दर महिन्याला 3 हजार SMS मोफत मिळणार आहेत.
सोमवारपासून कर्मचाऱ्यांचे क्रमांकट्रान्सफर :गुजरात सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जिओ बंधनकारक केल्यामुळे सोमवारपासून या कर्मचाऱ्यांचे आयडिया, वोडाफोनची सेवा बंद करण्यात आली आहे. गुजरात सरकारने याबाबतचा आदेश जारी केला आहे. याअंतर्गत सोमवारपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वोडाफोन-आयडियाची सेवा बंद करण्यात आल्याचेही कर्मचाऱ्यांना कळवण्यात आले आहे. यासोबतच या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे सर्व नंबर रिलायन्स जिओकडे ट्रान्सफर करण्यात आले आहेत.
सरकारने केली अधिसूचना जारी :गुजरातमध्ये आतापर्यंत राज्य सरकारी कर्मचारी अधिकृतपणे वोडाफोन-आयडिया कंपनीचे पोस्टपेड मोबाईल नंबर वापरत होते. पण सोमवारी 8 मे रोजी गुजरात सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये तात्काळ प्रभावाने वोडाफोन आयडियाच्या जागी रिलायन्स जिओ नंबर वापरण्यास सांगितले आहे. रिलायन्स जिओच्या प्लॅननुसार कर्मचारी फक्त 37.50 रुपयांच्या मासिक भाड्याने जिओचा CUG प्लान वापरू शकणार आहेत.
असा असेल कर्मचाऱ्यांसाठी प्लॅन :सरकारी कर्मचाऱ्याला रिलायन्स जिओ मासिक भाडे योजना 37.50 मध्ये मिळणार आहे. या प्लॅनद्वारे कोणत्याही मोबाइल ऑपरेटर, लँडलाइनवर मोफत कॉलिंग करता येईल. यासोबतच यूजरला दर महिन्याला 3 हजार SMS मोफत मिळणार आहेत. हे एसएमएस वापरल्यानंतर प्रत्येक एसएमएससाठी 50 पैसे शुल्क आकारले जाईल. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय एसएमएससाठी प्रति संदेश 1.25 रुपये शुल्क आकारले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. रिलायन्स जिओसोबत झालेल्या करारानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनाही या प्लॅन अंतर्गत दरमहा 30 जीबी 4जी डेटा दिला जाईल. ही मर्यादा संपल्यानंतर डेटा वाढवण्यासाठी प्लॅनमध्ये 25 रुपये खर्च करावे लागतील. या अतिरिक्त शुल्काद्वारे 60 GB पर्यंत 4G डेटा उपलब्ध होईल. 4G अमर्यादित प्लॅन जोडण्यासाठी दरमहा 125 रुपये द्यावे लागतील. त्याचवेळी सरकारी कर्मचाऱ्याला 4G च्या किमतीत 5G प्लॅन मिळणार आहे.