रांची (झारखंड): काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अवमानकारक टिप्पणी केल्याच्या प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गौतमकुमार चौधरी यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांच्याकडून न्यायालयात दुरुस्ती याचिका दाखल करण्यासाठी वेळ मागण्यात आला होता. त्यांची विनंती मान्य करत न्यायालयाने त्यांना याप्रकरणी याचिका दाखल करण्यासाठी वेळ दिला. या प्रकरणाच्या सुनावणीची पुढील तारीख ८ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे.
कनिष्ठ न्यायालयात दाखल केली होती तक्रार:यापूर्वीच उच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्ध कनिष्ठ न्यायालयाने जारी केलेल्या वॉरंटला स्थगिती दिली होती. जी पुढील आदेशापर्यंत वाढवण्यात आली आहे. चाईबासा येथील प्रताप कुमार यांनी राहुल गांधी यांनी अमित शाह यांच्यावर केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबाबत जिल्ह्यातील कनिष्ठ न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायाधीशांनी राहुल गांधी यांच्याविरोधात समन्स बजावले होते.
न्यायालयाने बजावले होते वॉरंट:समन्स बजावल्यानंतरही राहुल गांधींच्या वतीने एकही वकील हजर झाला नाही. त्यानंतर न्यायालयाने हे वॉरंट जारी केले होते. याच समन्स आणि वॉरंटला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. या आव्हान याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राहुल गांधींनी गृहमंत्री अमित शहा यांना खुनी संबोधल्याचे याचिकेत म्हटले आहे. अमित शाह यांच्यावर हे भाष्य राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केले होते. त्यावर अर्जदाराने दाखल केलेल्या याचिकेनंतर कनिष्ठ न्यायालयाकडून राहुल गांधींना वॉरंट बजावण्यात आले.