गिरिडीह (झारखंड) : झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी उशिरा एक प्रवासी बस बराकर नदीत कोसळली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाने या अपघाताची चौकशी सुरू केली. आता या चौकशीत एकामागून एक अनेक गोष्टी समोर येत आहेत. या बसच्या विम्याच्या कागदपत्रांमध्ये घोळ होता, असे आता उघडकीस आले आहे.
बसची स्कूटर म्हणून नोंद : आतापर्यंतच्या तपासात, विम्याच्या कागदपत्रांवर या बसची नोंद चक्क स्कूटर म्हणून असल्याचे समोर आले आहे. या बसचा विमा ऑनलाईन तपासला असता त्यातही तफावत आढळून आली. या प्रकरणी सखोल चौकशी केली असता, या बसचा जो वाहन क्रमांक आहे, त्या वाहनाचा विमा इन्शुरन्स कंपनीनुसार दुचाकी वाहनाचा आहे. स्कूटरच्या विमा पेपरमध्ये एका पॉलिसी क्रमांकाचा उल्लेख आहे. या क्रमांकावर जारी करण्यात आलेली पॉलिसी पंकज कुमार यांच्या नावाने दिसत आहे. मात्र अपघात झालेली बस राजू खान यांच्या नावावर आहे.
प्रीमियम वाचवण्यासाठी असे केले जाते : यानंतर ईटीव्ही भारतने या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर आणि अधिवक्ता प्रवीण कुमार यांच्याशी संपर्क साधला. प्रभाकर यांनी सांगितले की, ते मोटार विम्याचे काम करतात. अपघातानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. ज्यामध्ये अपघातग्रस्त बसचा विमा स्कूटरच्या नावावर असल्याचे आढळून आले. हा गंभीर गुन्हा असल्याचे ते म्हणाले. 'कोणत्याही वाहनाचा थर्ड पार्टी इन्शुरन्स आवश्यक आहे. अपघातग्रस्त बसचा थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम सुमारे 60 हजार इतका येतो. हे 60 हजार वाचवण्यासाठी अनेकजण अशी शक्कल लढवतात, असे प्रभाकर यांनी सांगितले.