झाबुआ - मध्यप्रदेशातील या जिल्ह्यातील रायपुरिया पोलिस स्टेशन परिसरातून मानवतेला लाजवेल असा व्हिडिओ समोर आला आहे. काहीजण एका महिलेला विवस्त्र करून काठ्यांनी मारहाण करत आहेत. यावेळी महिलेचे कपडेही फाडले. मात्र हे हल्लेखोर तिला मारहाण करत राहिले. महिलेला नग्न अवस्थेत मारहाण केल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस सक्रिय झाले. त्यांनी 3 आरोपींना अटक केली. इतरांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी महिला आणि तिच्या पतीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. (jhabuaa man beaten woman)
महिलेला नग्न करून मारहाण - ही घटना रायपुरिया पोलीस स्टेशन हद्दीतील रुपारेल गावातील आहे. गुरुवारी दुपारी एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये काही लोक महिला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण करत आहेत. या मारामारीत महिलेचे कपडेही फाटले. त्यानंतरही आरोपी थांबले नाहीत. व्हिडिओमध्ये महिलेचा पती हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आरोपी महिलेला बळजबरीने मोटारसायकलवर बसवून घेऊन जात आहेत. हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचताच पोलिसांनी मुख्य आरोपी मुकेश कटारा रा. अजब बोराली गाव आणि त्याचे दोन साथीदार गोपाळ आणि शंभू यांना अटक केली. त्यांच्या हातून महिलेची सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.