राजकोट (गुजरात) : गुजरातच्या राजकोट जवळील जेतपूरमध्ये साडी छपाईचा मोठा उद्योग आहे. येथील तीन युनिटमध्ये कपड्यांना इस्त्री करण्याचे काम लहान मुलांकडून करवले जात होते. त्या बदल्यात रोजदारीच्या नावावर त्यांना एक रुपयाही मिळायची नाही. रोजदारी म्हणून त्यांना फक्त जेवण दिले जायचे. मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेकडून याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एक टीम तयार केली. त्यानंतर साडी प्रिंटिंगच्या तीन युनिटवर छापा टाकून 29 मुलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी तीन युनिटच्या मालकांवर बालमजुरी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मुलांना बाल संरक्षण गृहात ठेवणार :'सेव्ह द चिल्ड्रन' संस्थेला सर्वप्रथम या प्रकरणी माहिती मिळाली होती. संस्थेच्या पथकाने पोलिसांना सोबत घेऊन युनिटवर छापा टाकला. या मुलांना उत्तर प्रदेश आणि बिहारमधून मजूरीसाठी आणण्यात आले होते. गेल्या ६ महिन्यांपासून मुलांकडून हे काम करवून घेतले जात होते. पोलिसांनी नवागढमधील सेम्स तबरेक प्रिंट फिनिशिंगमधील 12, नवागढमधील उत्तर दरवाजा भागातील काजल फिनिशिंग मधून 5 आणि नीता फिनिशिंगमधील 3 मुलांची सुटका केली आहे. सर्व मुलांना शहर पोलीस ठाण्यात आणून कोविड चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना राजकोटच्या बाल संरक्षण गृहात ठेवण्यात येणार आहे. मुलांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांना त्यांच्या राज्यात वापस पाठवले जाईल.