पाटणा : बिहारमधील जेडीयूच्या बैठकीत आता भाजपसोबतची युती ठेवायची नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान ( Governor Fagu Chauhan ) यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे आजच भेटीची वेळ मागितली आहे, असे सुत्रांचे म्हणणे आहे. मात्र, राज्यपालांच्या सचिवालयाने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, राज्यपाल फागू चौहान दिल्लीहून पाटण्याला पोहोचल्याचे वृत्त आहे.
राज्यपालांच्या भेटीनंतर चित्र स्पष्ट होणार : बिहारमध्ये सर्व राजकीय अटकळांच्या दरम्यान राजभवनाभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महाआघाडीतील घटक पक्षांच्या बैठकीनंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली सर्व नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचू शकतात, असे वृत्त आहे. आता सीएम नितीश कुमार यांना राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मिळेल, त्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.