विजयपूर (कर्नाटक) : सिंदगी विधानसभा मतदारसंघातील जनता दलाचे (जेडीएस) उमेदवार शिवानंद पाटील यांचे शुक्रवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुढील विधानसभा निवडणुकीसाठी सिंदगी मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून 54 वर्षीय शिवानंद पाटील यांची नुकतीच घोषणा करण्यात आली होती.
अचानक हृदयविकाराचा झटका : शिवानंद पाटील शुक्रवारी सकाळी विजयपूर आणि नागठाणा मतदारसंघात एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत जेडीएसच्या पंचरत्न यात्रेत सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर पाटील सिंदगीला गेले. तेथे रात्री उशिरा त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर पाटील यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
कुमारस्वामी यांचे ट्विट : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी ट्विट करून पाटील यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ' जेडीएसचे सिंदगी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार शिवानंद पाटील यांच्या अकाली निधनाने मला खूप मोठा धक्का बसला आहे. शिवानंद पाटील यांच्या निधनाने मी वैयक्तिकरित्या दु:खी झालो आहे. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि कुटुंबियांना दु:ख सहन करण्याची ताकद मिळो', असे एचडी कुमारस्वामी यांनी ट्विट केले आहे. कुमारस्वामी पुढे म्हणाले, 'लष्करातील निःस्वार्थ सेवेनंतर निवृत्त झालेल्या पाटील यांना समाजसेवेची अदम्य इच्छा होती. त्यांच्याकडे उत्कृष्ट संघटनात्मक कौशल्ये आणि गतिशीलता होती. त्यांच्याशी ओळखीनंतर अल्पावधीतच ते मला खूप प्रिय झाले'.