जम्मू-काश्मीर -सीमावर्ती भागात तैनात जवानांनी शुक्रवारी दिवाळी साजरी केली. हे जवान कुटुंबियांपासून दूर आहेत. मात्र, देशातील नागरिकांना सुरक्षेत सण-उत्सव साजरे करता यावे, यासाठी ते घरांपासून दूर राहून कर्तव्य बजावत आहेत.
जम्मूत जवानांनी साजरी केली दिवाळी -
जम्मूच्या आरएस पुरामध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मेणबत्त्या पेटवल्या आणि फटाके फोडले. "आमची दोन कुटुंबे आहेत, एक घरी असलेले आणि दुसरे सुरक्षा दलाचे सोबत असलेले जवान ज्यांच्यासोबत आम्ही दिवाळी साजरी करत आहोत," असे एक जवान म्हणाला.
हेही वाचा -पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत सात ठार
त्रिपुरात बांगलादेशी सैन्याला मिठाईची भेट -
त्रिपुरामध्ये, बीएसएफच्या जवानांनी आणि बॉर्डर गार्ड बांगलादेशने (बीजीबी) दिवाळीच्या आदल्यादिवशी अखौरा-अगरतला येथील संयुक्त चेकपोस्टवर मेणबत्त्या पेटवल्या. कार्यक्रमादरम्यान बीएसएफने बीजीबी जवानांला मिठाई भेटवस्तू म्हणून दिली. मिझोरम आणि कॅचर येथील बीएसएफ जवानांनी दिवाळीनिमित्त बीजीबीला मिठाई भेटवस्तू दिल्या.
जवानांसाठी दिवा लावण्याचे पंतप्रधान मोदींनी केले होते आवाहन -
सीमेवर राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना अभिवादन म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना दिवाळीच्या दिवशी दिवे प्रज्वलित करण्याचे आवाहन केले होते. आपल्या मन की बात रेडिओ कार्यक्रमातील एक क्लिप पोस्ट करत पंतप्रधान म्हणाले, "या उत्सवाच्या काळातही आपल्या सीमांचे रक्षण करणारे, भारतमातेची सेवा करणारे आणि आपल्याला सुरक्षा पुरविणाऱ्या आपल्या शूर सैनिकांना आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यांच्या कार्याची आठवण ठेऊन आपण दिवाळी साजरी केली पाहिजे. त्यामुळे भारत मातेच्या या या शूर मुलांसाठी आणि मुलींसाठी दिवा लावा." असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते.
हेही वाचा -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा, जवानांसाठी एक दिवा लावण्याचे केले आवाहन