राजौरी/जम्मू: जम्मू आणि काश्मीरच्या राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा असलेले पाकिस्तानी ड्रोन पाडले आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू आहे. अधिकृत सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ड्रोनला जोडलेल्या पॅकेटमधून एके रायफलची काही मॅगझिन, रोख रक्कम आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नियंत्रण रेषेला लागून असलेल्या बेरी पाटण आणि सेयोत भागात हवेत एक संशयास्पद वस्तू दिसली, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. या कारवाईत एक ड्रोन पाडण्यात सुरक्षा दलांना यश आल्याचे त्यांनी सांगितले.
विविध प्रकारचे साहित्य जप्त -सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या वस्तूंपैकी एक एके रायफल, एक सीलबंद बॉक्स आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे. या भागातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात असून आणखी काही जप्ती अपेक्षित असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही फक्त एवढेच सांगू शकतो की ड्रोन यशस्वीरित्या पाडण्यात आले आहे. त्यातून विविध प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती नंतर शेअर केली जाईल.