महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Jallianwala Bagh Massacre : जालियनवाला बाग हत्याकांडातील जखमा अजूनही आहेत ताज्या, जाणून घ्या काय होता इतिहास

जालियनवाला बाग हत्याकांड हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काळा दिवस म्हणून इतिहासात कूप्रसिद्ध आहे. अमृतसरच्या जवळ असलेल्या जालियनवाला बागेत शांतता सभेसाठी जमलेल्या लाखो भारतीय नागरिकांवर जनरल डायरच्या जुलमी सैनिकांनी गोळीबार केला. या गोळीबारात हजारो भारतीय नागरिकांचा बळी गेला आहे.

Jallianwala Bagh Massacre
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 13, 2023, 10:46 AM IST

हैदराबाद :भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील इतिहासात 13 एप्रिल हा दिवस काळा दिवस म्हणून गणला जातो. 13 एप्रिल 1919 या दिवशी अमृतसरच्या ऐतिहासिक सुवर्ण मंदिराजवळील जालियनवाला बागेत शांतता सभेसाठी जमलेल्या हजारो भारतीयांवर ब्रिटीश अधिकाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यामुळे ब्रिटीशांच्या गोळीबारामुळे घाबरलेल्या अनेक महिलांनी आपला जीव वाचवण्यासाठी चिमुकल्यांसह जालियनवाला बागेतील विहिरीत उड्या मारल्या. त्यामुळे या विहिरीत मृतदेहांचा खच झाला. बागेतून बाहेर पडण्याचा मार्ग अरुंद असल्याने चेंगराचेंगरीत अनेक नागरिक चिरडले गेले. तर हजारो भारतीय नागरिक जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांच्या गोळीबाराने मृत झाले. त्यामुळे आजही जालियनवाला बाग हत्याकांडाच्या जखमा ताज्याच आहेत.

संग्रहित छायाचित्र

रौलेट कायद्याला विरोध : इंग्रज अधिकाऱ्यांना सर्वाधिकार देणारा काळा कायदा ब्रिटीश सरकारने १० मार्च १९१९ ला संमत केला होता. रौलेट कायद्यानुसार इंग्रज अधिकाऱ्यांना कोणत्याही चौकशीशिवाय कोणत्याही भारतीयाला तुरुंगात डांबण्याचा अधिकार देण्यात आला होता. त्यामुळे या कायद्याविषयी भारतीयांच्या मनात प्रचंड असंतोष उफाळून आला होता. त्यामुळे या कायद्याला भारतीय नागरिक काळा कायदा म्हणून संबोधत होते. त्यामुळे देशभरात या कायद्यामुळे अशांतता पसरली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सत्याग्रह सुरू केला. ७ एप्रिल १९१९ रोजी महात्मा गांधींनी सत्याग्रही नावाचा लेख प्रकाशित करुन आंदोलनाबाबतच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे या सत्याग्रहात सहभागी झालेल्या नागरिकांसह महात्मा गांधींवरही कारवाई करण्याच्या हालचाली ब्रिटीश सरकारने सुरू केल्या होत्या. त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी महात्मा गांधींना पंजाबमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली. यासोबतच या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांना अटक करण्यात येईल असेही बजावण्यात आले. पंजाबचे तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओड्वायर यांनी महात्मा गांधी यांना बर्माला पाठवण्याच्या सूचना केली. त्यामुळे वातावरण आणखीणच चिघळले. भारतीयांच्या मनात असंतोष खदखदत राहिला.

संग्रहित छायाचित्र

अमृतसरमध्ये रौलेट कायद्याच्या विरोधात आंदोलन :भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नेते सैफुद्दीन किचलू आणि डॉ सत्यपाल या दोन नेत्यांनी रौलेट कायद्याच्या विरोधात अमृतसरमध्ये शांततापूर्ण आंदोलन केले. 9 एप्रिल 1919 रोजी रामनवमीच्या दिवशी डायरने तत्कालीन उपायुक्त इरविंग यांना हे आंदोलन दडपण्यासाठी पाठवले. मात्र याच वेळी डॉ. सत्यपाल आणि डॉ. किचलू यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. 10 एप्रिल 1919 रोजी त्याचे दोन नेत्यांची सुटका करण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी उपायुक्त इरविंग यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. या मोर्चात इंग्रजांनी केलेल्या जुलूमामुळे अनेक नागरिक जखमी झाले. त्यातील अनेकांचा बळीही गेला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी लाठ्या काठ्या आणि दगडांनी प्रत्युत्तर दिले. पुढे आलेल्या अधिकाऱ्यावर आंदोलकांनी हल्ला केला.

असे झाले जालियनवाला बागेत हत्याकांड :रौलेट कायदा पारित केल्यानंतर इंग्रज सरकारने सर्व आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. १३ एप्रिल १९१९ ला जालियवाला बागेत हजारो नागरिक जमले होते. मात्र ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हा राजकीय मेळावा असल्याचा आरोप केला. जनरल डायर या इंग्रज अधिकाऱ्याने बंदी आदेश दिल्यानंतरही नागरिक जमल्याचा कांगावा करत जालियनवाला बागेत जमलेल्या नागरिकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. कोणतीही सूचना न देता जनरल डायरने जालियनवाला बागेला चारी बाजुने घेरत गोळीबार केल्यामुळे नागरिक बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. जनरल डायरचे जुलमी सैनिक 10 ते 15 मिनिटे सतत गोळीबार करत राहिले. या गोळीबारात 1650 राउंड फायर करण्यात आले. दारूगोळा संपेपर्यंत गोळीबार सुरूच होता. मात्र गोळीबार सुरू असल्याने वाचवण्यासाठी अनेकांनी बागेतील विहिरीत उड्या घेतल्या, तर काहीजण चेंगराचेंगरीत ठार झाले. तरीही जनरल डायर आणि इरविंग यांनी गोळीबार सुरूच ठेवला. या हत्याकांडात 291 नागरिकांचा बळी गेल्याचा अंदाज सरकारी आकड्यातून लावण्यात येतो. मात्र मदन मोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने मृतांची संख्या 500 पेक्षा जास्त असल्याचा अहवाल दिला.

हेही वाचा - Yashwantrao Chavan Birth Anniversary : सामान्य माणसाचा नेता, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती

ABOUT THE AUTHOR

...view details