पालघर: मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्याच्या हद्दीत जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. रेल्वे सुरक्षा दलाचा कॉन्स्टेबल चेतन कुमारने धावत्या रेल्वेमध्ये आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात या 4 जणांचा मृत्यू झाला आहे. चेतन कुमारला अटक करण्यात आली असून त्याला बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. आरोपीला दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अशी घडली घटना:रेल्वेमध्ये गोळीबाराची घटना सोमवारी पहाटे मुंबई सेंट्रल एसएफ एक्स्प्रेसमध्ये दहिसर आणि मीरा रोड दरम्यान घडली. घटनेनंतर पोलिसांनी माध्यमांना सांगितले की, सुरतहून मुंबईला येत होता. या प्रवासादरम्यान वापी येथे चेतन आणि बी-५ बोगीमध्ये असणाऱ्या प्रवाशांमध्ये वाद झाला होता. यात चेतनच्या संतापाचा पारा चढला. त्याने स्वत:कडील रिव्हॉल्व्हर प्रवाशांवर रोखले. यावेळी आरपीएफचे सहायक पोलीस निरीक्षक टिका राम मीना तेथे आले. प्रवाशांवर पिस्तूल रोखून असलेल्या चेतनची ते समजूत काढू लागले. मात्र, संतापलेल्या चेतनने त्यांच्यावर गोळी झाडली. यानंतर चेतन सिंह याने इतर तीन प्रवाशांनाही गोळ्या घातल्या.
गोळीबारानंतरचा व्हिडिओ व्हायरल-चेतन कुमारचा रेल्वेमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात त्याच्या गोळीबारात मृत पडलेल्या मृतदेहासमोर उभा असल्याचे दिसत आहे. एका विशिष्ट समाजाविषयी द्वेषपूर्ण विधान करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 'ईटीव्ही भारत'कडे देखील आहे. परंतु समाजाप्रती संवदेनशील भावना ठेवून 'ईटीव्ही भारत' तो व्हिडिओ प्रसारित करणार नाही.