हैदराबाद :आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची बहीण वाय. एस. शर्मिला या तेलंगणाच्या राजकारणात उडी घेण्याची शक्यता आहे. मंगळवारी नालगोंडामधील काही नेत्यांची भेट त्यांनी घेतली होती, यानंतर याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.
आंध्र प्रदेशचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी (वायएसआर) हे जगनमोहन आणि शर्मिला यांचे वडील. २००४ ते २००९पर्यंत ते आंध्रचे मुख्यमंत्री होते. २००९मध्ये एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या हितचिंतकांसोबत आज शर्मिला यांनी चर्चा केली.
चर्चांना उधाण, मात्र शर्मिला यांचे मौन..
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शर्मिला या तेलंगणाच्या राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. जनगमोहन यांच्या मदतीशिवाय, स्वंतत्रपणे त्या तेलंगणामध्ये राजकीय पक्ष सुरू करणार असल्याचा तर्क लोकांमधून केला जात आहे. त्या वायएसआर यांच्या निकटवर्तीय काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे. शर्मिला यांनी मात्र यांपैकी कोणत्याही गोष्टीची पुष्टी केली नाही. आजच्या बैठकीबाबत त्या म्हणाल्या, की "नालगोंडा जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न समजून घेण्यासाठी मी या लोकांना बोलावले होते. ही केवळ एक साधारण बैठक होती."