श्रीनगर - जम्मू काश्मीर खोऱ्यात शांततेला सुरुंग लावणाऱ्या दहशतवाद्यांचा नेस्तानाबूत करण्यासाठी सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये बुधवारी संध्याकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक ( Terrorist killed in South Kashmir ) झाली. यात सहा दहशतवादी ठार झाले आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी याबाबत माहिती दिली. आतापर्यंत ठार झालेल्या सहापैकी चार जणांची ओळख पटली आहे. यातील दोन हे पाकिस्तानी आणि दोन स्थानिक दहशतवादी असल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले. तर उर्वरीत दोन दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे.
पहिली चकमक बुधवारी संध्याकाळी अनंतनाग जिल्ह्यातील डुरू, शाहाबाद भागात झाली. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या गोळीबारात एक पोलीस जखमी झाला आहे. जखमी पोलिसांना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.