श्रीनगर (जम्मू काश्मीर) -कुलगाममध्ये गुरुवारपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलादरम्यान चकमक सुरू आहे. अखेर आज सकाळी एका दहशतवाद्याला ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. बीएसएफचा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे जात असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत दोन सैनिक आणि दोन नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे.
गुरुवारी जम्मू -काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी बीएसएफच्या ताफ्यावर हल्ला केला. सुरक्षा दलांनी लष्करच्या दोन दहशतवाद्यांना घेरले. यावेळी दहशतवाद्यांनी घराचा आश्रय घेतला आणि सुरक्षा दलावर गोळीबार सुरूच ठेवला. यावर जोरदार प्रत्युत्तर देत सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. रात्री पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणी अडकलेल्या 22 नागरिकांना बाहेर काढले. तर अंधारामुळे रात्रभर चकमक स्थगित करण्यात आली होती. सकाळी परत मोहीम सुरू करण्यात आली.
जानेवरी 2021 पासून जम्मू-काश्मीरमध्ये 89 अतिरेकी ठार -
जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षात आतापर्यंत सुरक्षा दलांनी 89 पेक्षा जास्त अतिरेक्यांना ठार केले आहे. ही माहिती लष्कर आणि पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. परंतु यावर्षी अधिक कमांडर मारले गेले आहेत. तसेच केंद्रशासित प्रदेशात सुमारे 200-225 दहशतवादी सक्रिय असल्याचे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) विजय कुमार यांनी सांगितले होते. तर जम्मू काश्मीरमधील तरूण मुले व्हिसा काढून पाकिस्तानात जातात आणि तेथून दहशतवादाचे प्रशिक्षण घेऊन परतात. गेल्या काही दिवसांत 40 तरुण व्हिसा काढून कायदेशीर मार्गाने पाकिस्तानला गेले. त्यातील 27 जण शस्त्रांसह परतले आणि चकमकीत मारले गेले. तर अद्याप काही जण पाकिस्तानात आहेत.
काही दहशतवाद्यांचे आत्मसमर्पणही -
जम्मू-काश्मीरच्या प्रदेशात शांती प्रस्थापित करणं अवघड आहे. पाकिस्तान आणि फुटिरतावादी या दोन घटकांमुळे या भागात कायम तणाव राहिला आहे. खोऱ्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी गेल्या कित्येक दशकांपासून करण्यात येत आहेत. मात्र, दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये सुरक्षा दलांनी शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच, बऱ्याच दहशतवाद्यांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी आत्मसमर्पणही केलं आहे.
हेही वाचा -VIDEO : "शरण ये..."; दहशतवादी मुलाला वाचवण्यासाठी बापाची आर्जवं...