नवी दिल्ली Gurpatwant Singh Pannu : शीख फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नू (US On Gurpatwant Singh Pannu) याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेनं एका भारतीय अधिकाऱ्यावर केलाय. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं गुरुवारी प्रतिक्रिया दिली. सरकारच्या धोरणासाठी ही चिंतेची बाब असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं (MEA Spokesperson Arindam Bagchi) सांगितलं. गुरपतवंत सिंग पन्नू हा अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांचा नागरिक असल्याची माहिती मिळत आहे.
भारत-अमेरिकेचे संबंध ताणले? अमेरिकेच्या आरोपांना भारतानं दिलं प्रत्युत्तर - भारतीय परराष्ट्र मंत्रालय
Gurpatwant Singh Pannu : भारतीय अधिकाऱ्यावर शीख फुटीरतावाद्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेनं केलाय. यावर आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ही चिंतेची बाब आहे आणि हे भारत सरकारच्या धोरणाच्या विरोधात असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं.
Published : Nov 30, 2023, 6:31 PM IST
प्रकरणाची होणार चौकशी : परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, एका व्यक्तीविरुद्ध अमेरिकन कोर्टात खटला सुरू आहे. त्याचा संबंध एका भारतीय अधिकाऱ्याशी जोडला जात असल्याचा आरोप आहे. हा आरोप चिंतेचा विषय आहे. तसेच हे सर्व प्रकरण सरकारी धोरणाच्या विरोधात आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाकडून चिंता व्यक्त : संबंधित प्रकरणाची सर्व बाजू गांभीर्यानं पाहण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. अशा सर्व प्रकरणाचे इनपुट आम्ही अतिशय काळजीपूर्वक आणि गांभीर्यानं घेतो. तसेच समितीच्या निष्कर्षांवर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. आम्ही अशा सुरक्षेशी संबंधित कोणतीही माहिती सामायिक करू शकत नाही, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं दिली. तसेच कॅनडाच्या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्रालयानं टिपण्णी केली. कॅनडा हा भारतविरोधी दहशतवाद्यांना आणि हिंसाचाराला स्थान देत आहे आणि हाच मुद्दा या सर्व प्रकरणाचा गाभा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.