नवी दिल्ली ISRO Aditya L1 : नवीन वर्षात इस्रोनं एक ऐतिहासिक कामगिरी केली. 2 सप्टेंबर 2023 रोजी सुरू झालेला आदित्य उपग्रहाचा प्रवास संपला आहे. भारताचा आदित्य उपग्रह L1 पॉइंटच्या हॅलो ऑर्बिटमध्ये दाखल झाला. आता पृथ्वीपासून भारताच्या पहिल्या सौर वेधशाळेचं अंतर 15 लाख किमी आहे. 400 कोटी रुपयांचं हे मिशन आता भारतासह संपूर्ण जगाला सौर वादळांची माहिती देऊ शकेल. ज्यामुळे उपग्रहांचं संरक्षण करणं सोपं होईल.
मोदींनी केलं कौतुक : इस्रोच्या या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी त्यांच्या 'X' हँडलवर एक पोस्ट केली. "भारतानं आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. भारताची पहिली सौर वेधशाळा आदित्य L1 निश्चित केलेल्या स्थळी पोहोचली. ही सर्वात गुंतागुंतीच्या अंतराळ मोहिमांपैकी एक होती, जिचं यश आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे. मानवतेच्या फायद्यासाठी आम्ही विज्ञानाच्या नवीन सीमांचा पाठपुरावा करत राहू", असं मोदी म्हणाले.
पाच महिने प्रवास केला : आदित्यचा प्रवास 2 सप्टेंबर 2023 ला सुरू झाला होता. पाच महिन्यांनंतर, 6 जानेवारी 2024 ला उपग्रह L1 पॉइंटवर पोहोचला. आदित्य आता सूर्याचा अभ्यास करणाऱ्या नासाच्या इतर चार उपग्रहांच्या गटात सामील झाला आहे. WIND, Advanced Composition Explorer (ACE), डीप स्पेस क्लायमेट ऑब्झर्व्हेटरी (DSCOVER) आणि NASA-ESA ची संयुक्त मोहीम SOHO म्हणजेच सौर आणि हेलिओस्फेरिक वेधशाळा, हे ते चार उपग्रह आहेत.
आदित्य एल 1 चे महत्व काय : आदित्यला L1 पॉइंटवर ठेवणं आव्हानात्मक काम होतं. यामध्ये वेग आणि दिशा यांचा योग्य समन्वय आवश्यक असतो. यासाठी इस्रोला त्यांचं अंतराळयान कुठे आहे हे जाणून घेणं आवश्यक होतं. आदित्य एल 1 मिशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर निगार शाजी यांनी एका मुलाखतीत याबद्दल अधिक माहिती दिली. "सुमारे 400 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ सूर्याचा अभ्यास करण्यात मदत होणार नाही, तर सौर वादळांचीही माहिती मिळणार आहे. याद्वारे भारताच्या पन्नास हजार कोटी रुपयांच्या पन्नास उपग्रहांचं संरक्षण होऊ शकतं. तसंच ज्या देशानं अशी मदत मागितली, त्यांनाही मदत केली जाईल. त्यामुळे हा प्रकल्प देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे", असं त्यांनी सांगितलं.
आदित्य L1 चा प्रवास : सप्टेंबर 2023 मध्ये प्रक्षेपण झाल्यानंतर, आदित्य 16 दिवस पृथ्वीभोवती फिरत राहिला. या काळात त्याची पाच वेळा कक्षा बदलण्यात आली, जेणेकरून त्याला योग्य गती मिळेल. त्यानंतर आदित्यला ट्रान्स-लॅरेंजियन 1 कक्षेत पाठवण्यात आलं. येथून 109 दिवसांचा मोठा प्रवास सुरू झाला. आदित्य एल 1 ही भारतातील पहिली अंतराळ आधारित वेधशाळा आहे. ती सूर्यापासून इतक्या अंतरावर स्थित असेल की तेथे तिला नियमित ऊर्जा मिळेल, मात्र कुठलीही इजा होणार नाही.
हे वाचलंत का :
- गुप्तचर माहितीसाठी 50 उपग्रह प्रक्षेपित करणार; एस सोमनाथांनी स्पष्टच सांगितलं इस्रोचं प्लॅनिंग
- चंद्रयान ३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग, जगभरात वाजला भारतीय शास्त्रज्ञांचा डंका
- चंद्रयानाच्या यशानंतर आता इस्रोला जायचंय अंतराळात, पुढील लक्ष्य गगनयान!