नवी दिल्ली : इस्रोच्या चंद्रयान 3 मोहिमेचं आज चंद्रावर सॉफ्ट लँडींग करण्यात येणार आहे. त्यासाठी जगभरातील नागरिकांच्या नजरा इस्रोच्या मोहिमेकडं लागल्या आहेत. चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी नागरिक प्रार्थना करत आहेत. देशभरातील सगळे नागरिक धार्मीक बेड्या तोडून चंद्रयान 3 मोहिमेसाठी एकत्र येत आहेत. ऋषिकेश, वाराणसी, प्रयागराज, वडोदरा यासह अमेरिकेतही चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी होमहवन, प्रार्थना आणि नमाज अदा करण्यात येत आहेत.
सर्वधर्मीय नागरिकांची प्रार्थना :इस्रोचं चंद्रयान 3 आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडींग करणार आहे. चंद्रयान 3 च्या यशस्वीतेसाठी आज नागरिक विविध धार्मीक स्थळांवर प्रार्थना करत आहेत. ऋषिकेशमधील परमार्थ निकेतनपासून ते अमेरिकेपर्यंत विविध देशातील नागरिकही चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना आणि पूजा अर्चा करत आहे. सर्वधर्मीय नागरिक चंद्रयान 3 च्या यशासाठी प्रार्थना करत आहेत.
चंद्रयान 3 मोहिमेसाठी गंगा आरती :चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी ऋषिकेश येथील परमार्थ निकेतन घाटावर गंगा आरती करण्यात आली. यावेळी गंगा आरतीत सहभागी झालेल्या भाविकांनी हातात तिरंगा घेऊन चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली. त्यासह विविध धार्मीक कार्यक्रमाचं आयोजनही ऋषिकेशमध्ये करण्यात आलं. आरतीपूर्वी भाविकांनी गंगेच्या परमार्थ निकेतन घाटावर पूजा केली. परमार्थ निकेतन घाटाचे आध्यात्मिक गुरु स्वामी चिदानंद मुनी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आरती करण्यात आली. यावेळी स्वामी चिदानंद मुनी यांनी वेदांपासून विज्ञानापर्यंत जग आपल्याला मान्यता देत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे भारत दक्षिण ध्रुवावर आपला झेंडा फडकावेल, असा विश्वास स्वामी चिदानंद मुनी यांनी व्यक्त केला.
दिल्ली, भुवनेश्वर, वाराणसी, प्रयागराजमध्ये प्रार्थना :चंद्रयान 3 मोहिमेसाठी देशभरातील नागरिक विविध ठिकाणी पूजा आणि प्रार्थना करत आहेत. यात दिल्ली, वाराणसी, भुवनेश्वर, प्रयागराज येथील नागरिकांनी चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली आहे. अलिगंज येथील हनुमान मंदिरात जमलेल्या भाविकांनी चंद्रयान यशस्वी होण्यासाठी आरती केली आहे. वडोदरातील तरुणांनीही चंद्रयान 3 यशस्वी होण्यासाठी आरती केली आहे.