तिरुअनंतपुरम : रविवारी, २० ऑगस्टला त्रिवेंद्रम येथे इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरसाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती परीक्षा झाली. या परीक्षेदरम्यान फसवणूकीची घटना घडली. उमेदवारांनी परीक्षेदरम्यान हेडसेट आणि मोबाईलचा वापर करून चिटींग करण्याचा प्रयत्न केला. आता या प्रकरणी केरळ पोलिसांना मोठं यश मिळालंय. पोलिसांनी या घटनेच्या सूत्रधारासह आणखी तीन जणांना अटक केली. हे सर्व हरियाणातील रहिवासी आहेत.
एकूण अटकेची संख्या ९ झाली : केरळ पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आरोपींना अटक केलीय. त्यांना आता पुढील तपासासाठी केरळमध्ये आणले जाणाराय. या आरोपींना रेल्वेने घरी आणण्यासाठी तपास पथकाची दोन पथकांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. ताज्या अटकेमुळे या प्रकरणातील एकूण अटकेची संख्या आता ९ झाली. यापूर्वी इस्रोच्या परीक्षेत फसवणुकीप्रकरणी केरळमधून ६ जणांना अटक करण्यात आली होती.
मोबाईलचा वापर करून फसवणूक करत होते : या प्रकरणी सर्वप्रथम, हरियाणातील दोन जणांना अटक करण्यात आली. त्रिवेंद्रममधील कॉटनहिल स्कूल आणि पट्टम स्कूलमधून पोलिसांनी संशयित उमेदवारांना अटक केली. ते परीक्षेदरम्यान हेडसेट आणि मोबाईलचा वापर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करत होते. या दोन तरुणांनी कथितरित्या मोबाइल फोनद्वारे प्रश्नपत्रिकेची छायाचित्रे क्लिक केली. त्यानंतर त्यांच्या मित्रांना पाठवली. ते आपला फोन बेल्टवर लपवून फोनच्या स्क्रीनद्वारे हरियाणातील त्यांच्या मित्रांना प्रश्न पाठवत होते. त्यानंतर त्यांना ब्लूटूथ इअरपीसद्वारे प्रश्नाची उत्तरं मिळत होती. या प्रकरणी त्रिवेंद्रम म्युझियम पोलिसांनी हरियाणातील रहिवासी सुमित कुमार आणि सुनील यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.
इस्रोने परीक्षा रद्द केली : या परीक्षेदरम्यान फसवणूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हरियाणातून एका निनावी कॉलद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे दोघांना पकडण्यात आलं. आरोपींची चौकशी केल्यानंतर पोलिसांना याचे धागे हरियाणापर्यंत जोडले गेले असल्याची माहिती मिळाली. सविस्तर तपास केल्यानंतर पोलिसांना फसवणूक प्रकरणात हरियाणातील एका कोचिंग सेंटरचाही हात असल्याचा सुगावा लागला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याच्या संशयावरून इस्रोने परीक्षा रद्द केली. राष्ट्रीय स्तरावरील ही भरती परीक्षा केवळ केरळमध्ये १० परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.
हेही वाचा :
- Narendra Modi ISRO : चंद्रयान 3 ज्या ठिकाणी उतरलं ती जागा 'या' नावानं ओळखली जाईल, पंतप्रधान मोदींची घोषणा
- Aditya L १ Mission : चंद्रानंतर इस्रोची सूर्याकडे झेप; 'आदित्य L1' मिशन 'या' तारखेला होणार लाँच