नवी दिल्ली :इस्रोने ऐतिहासिक चांद्रयान 3 मिशनचे नवे अपडेट्स शेअर केले आहेत. अंतराळयान आता हळूहळू चंद्राच्या जवळ जात आहे. चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट-लँडिंगचा पहिला प्रयत्न करेल.
सॉफ्ट लॅंडिंग 23 ऑगस्टलाच करणे गरजेचे का : चांद्रयानाचे सॉफ्ट लॅंडिंग 23 ऑगस्टलाच करणे आवश्यक आहे. यामागे एक मोठे कारण आहे. खरं तर, निरीक्षणे आणि प्रयोगांसाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी चांद्रयान चंद्रावर दिवसाच्यावेळी उतरणे गरजेचे आहे. सध्या चंद्रावर रात्र आहे. त्यामुळे पुढील दिवस उगवेपर्यंत वाट पाहिली जात आहे. 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर दिवस सुरू होईल. तेव्हा सूर्यप्रकाश सतत उपलब्ध असतो. जर काही कारणास्तव 23 ऑगस्ट रोजी लँडिंगचा प्रयत्न अशक्य झाल्यास, सॉफ्ट-लँडिंगसाठी चंद्रावर पुढचा दिवस उगवण्यापर्यंत वाट पाहावी लागेल. चंद्राचा एक दिवस पृथ्वीवरील सुमारे 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. चांद्रयान 3 च्या उपकरणांचे आयुष्य फक्त एक चंद्र दिवस किंवा 14 पृथ्वी दिवस आहे.
चांद्रयानाला सूर्यप्रकाश आवश्यक : तसेच दिवसा सॉफ्ट लँडिंगचे प्रमुख कारण म्हणजे अंतराळयानात सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे आहेत. त्यांना कार्यरत राहण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक आहे. रात्री चंद्र खूप थंड होतो. त्याचे तापमान उणे 100 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते. अशा कमी तापमानात विशेषतः डिझाइन केलेली इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे गोठून काम करणे थांबवू शकतात. त्यामुळेच इस्रोने चांद्रयान दिवसा सूर्यप्रकाशात उतरवण्याचा निर्णय घेतलाय.
रशियाचे यानही आहे चंद्राच्या कक्षेत : भारताचे चांद्रयान 3 आणि रशियाचे लूना 25 हे दोन्ही सध्या चंद्राच्या कक्षेत आहेत. ते दोघेही पुढच्या आठवड्यात चंद्रावर उतरण्याच्या तयारीत आहेत. लूना 25 हे चंद्रावर 21 ऑगस्टला उतरणे अपेक्षित आहे. तर चांद्रयान 3 दोन दिवसांनी म्हणजे 23 ऑगस्टला उतरणे अपेक्षित आहे. या दोन्ही मोहिमांचे उद्दिष्ट चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अशा क्षेत्रात उतरणार आहे, जेथे यापूर्वी कोणतेही अंतराळयान गेलेले नाही.
रशियाच्या यानाचे लँडिंग सूर्यप्रकाशावर अवलंबून नाही : आपण रशियाच्या लुना 25 बद्दल बोललो तर त्याला चंद्रावर उतरण्यासाठी दिवस किंवा रात्रीचा फरक पडत नाही. लुना 25 देखील भारताच्या चांद्रयान 3 प्रमाणे सौर उर्जेवर चालते. पण त्यात एक विशेष सुविधा आहे जी भारताकडे नाही. लुना 25 कडे रात्रीच्यावेळी उपकरणांना उष्णता आणि शक्ती प्रदान करण्यासाठी ऑनबोर्ड जनरेटर आहे. त्याचे आयुष्य एक वर्ष आहे. त्यामुळे लुना 25 चे लँडिंग चंद्रावरील सूर्यप्रकाशावर अवलंबून नाही.
रशियाचे यान चांद्रयानापेक्षा जास्त शक्तिशाली : पूर्वीच्या सोव्हिएत युनियनचे लुना 24 यान 1976 मध्ये चंद्रावर लँड झाल्यापासून, केवळ चीन 2013 आणि 2018 मध्ये चंद्रावर अंतराळ यान उतरवू शकला आहे. ही याने उत्तर ध्रुवावर उतरली आहेत. भारत आणि रशिया या दोघांच्या यानाचे लँडिंग दक्षिण ध्रुवाजवळ होणार आहे. मात्र त्यांचे ठिकाण अद्याप निश्चित नाही. 10 ऑगस्ट रोजी प्रक्षेपित केलेले लुना 25, प्रक्षेपणानंतर अवघ्या सहा दिवसांत चंद्राच्या कक्षेत पोहोचले. तर चांद्रयान 3 ला चंद्राच्या कक्षेत पोहोचायला 23 दिवस लागले. याचे कारण म्हणजे लुना 25 चे रॉकेट भारताच्या चांद्रयान 3 पेक्षा जास्त शक्तिशाली आहे. इस्रोकडे अद्याप चंद्राच्या कक्षेत थेट जाण्याइतके शक्तिशाली रॉकेट नाही.
हेही वाचा :
- Chandrayaan-3 : चांद्रयान-३ चंद्राच्या अगदी जवळ; 23 ऑगस्टला करणार लँडिंग
- Chandrayaan 3 Mission : चांद्रयान 3 मोहिमेत महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान
- Chandrayaan 3 : चांद्रयान चंद्राच्या आणखी जवळ , पाहा इस्रोने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ