मुंबई :इस्रोचे चांद्रयान 3 अवकाशात झेपावले आहे. चांद्रयान 3 ने आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर मधून शुक्रवारी दुपारी 2.38 वाजता अवकाशात झेप घेतली. चांद्रयान 3 च्या चंद्रापर्यंतच्या प्रवासाला सुमारे एक महिना लागण्याचा अंदाज आहे. चांद्रयानाचे 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर लँडिंग अपेक्षित आहे. लँडिंग केल्यावर ते एका चंद्रदिवसासाठी कार्यरत असेल. चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो.
चांद्रयान 2 चा अपघात झाला होता : चांद्रयान 3 भारताची तिसरी चंद्र शोध मोहीम आहे. या मोहिमेनंतर चंद्राच्या पृष्ठभागावर आपले अंतराळ यान उतरवणारा भारत हा अमेरिका, चीन आणि रशियानंतर चौथा देश बनेल. इस्रोच्या चांद्रयान 2 यानाचा 2019 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करताना अपघात झाला होता. त्यामुळे या मिशनचे मुख्य उद्दिष्टे अयशस्वी झाल्याचे मानले गेले.
पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा : चांद्रयान ३ लँडर रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलने सुसज्ज आहे. याचे वजन सुमारे 3,900 किलोग्रॅम आहे. 14 जुलै 2023 हा दिवस भारताच्या अंतराळ क्षेत्रातील इतिहासात नेहमी सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणाच्या आधी सांगितले. चांद्रयान 3 मोहिमेसाठी शुभेच्छा देताना, पंतप्रधान मोदींनी लोकांना या चंद्र मोहिमेबद्दल आणि भारताने अंतराळ विज्ञान आणि नवनिर्मितीमध्ये केलेल्या प्रगतीबद्दल अधिक जाणून घेण्याचे आवाहन केले.
भारतासाठी गेम चेंजर ठरेल : चांद्रयान 3 च्या विकासाचा टप्पा जानेवारी 2020 मध्ये सुरू झाला होता. 2021 मध्ये याचे प्रक्षेपण नियोजित होते. मात्र कोविड - 19 महामारीमुळे मिशनला विलंब झाला. इस्रोचे माजी संचालक के. सिवन यांनी सांगितले की चांद्रयान 3 मोहिमेच्या यशामुळे 'गगनयान' जी भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे तीचे मनोबल वाढेल. देशाच्या अंतराळ क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनी गुरुवारी सांगितले की, चांद्रयान 3 मोहीम यशस्वी होणार आहे आणि भारतासाठी ही गेम चेंजर घटना आहे.
हेही वाचा :
- Chandrayaan 3 Mission Spacecraft : चांद्रयान-३ अवकाशात झेपावले; भारतासाठी ऐतिहासिक क्षण
- Chandrayaan 3 Launch : चांद्रयान ३ चे मोहिमेत सुरतच्या कंपनीने 'हे' दिले महत्त्वाचे योगदान
- Chandrayaan 3 : चांद्रयान 3 मोहिमेसाठी अनेक देशांची इस्रोला मदत करण्याची तयारी: जाणून घ्या काय म्हणाले खगोलशास्त्रज्ञ रमेश कपूर