नवी दिल्ली : 'चांद्रयान 3' चे सॉफ्ट लॅंडिंग बुधवारी, 23 ऑगस्टला नियोजित आहे. मात्र त्या दिवशी काही तांत्रिक अडचणी आल्यास ते लॅंडिंग पुढे देखील ढकलले जाऊ शकते. रशियाचे 'लुना 25' हे यान चंद्रावर लॅंड करताना अखेरच्या क्षणी क्रॅश झाले होते. त्यामुळे आता इस्रो चांद्रयानाबाबत कुठलीही जोखीम घेणार नाही.
तर 27 ऑगस्टला मॉड्यूल चंद्रावर उतरवू : इस्रोच्या अहमदाबादस्थित स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश एम देसाई यांनी यासंबंधी माहिती दिली. 'आम्ही २३ ऑगस्टच्या सॉफ्ट लँडिंगसाठी पूर्ण तयारी केलीय. त्या दिवशी लँडिंग होईल अशी आम्हाला आशा आहे. लँडिंगच्या दोन तास आधी आम्ही लँडरच्या मॉड्यूलची स्थिती आणि चंद्रावरील परिस्थिती लक्षात घेऊन त्यावेळी लँडिंग करणे योग्य आहे की नाही हे ठरवू. मात्र कोणताही घटक अनुकूल नसल्याचं दिसल्यास आम्ही 27 ऑगस्टला हे मॉड्यूल चंद्रावर उतरवू. त्यासाठीही आम्ही सर्व तयारी केली आहे, असे देसाई म्हणाले.
लॅंडिंगच्या 2 तासांपूर्वी कमांड अपलोड करू : 'लँडिंग संध्याकाळी 5.47 वाजता सुरू होईल, ज्याला जवळपास 17 मिनिटे आणि 21 सेकंद लागतील. आम्ही 2 तासांपूर्वी कमांड अपलोड करू. आम्ही लँडरमधील इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल उपप्रणालीची टेलीमेट्री अनुकूल आहे की नाही याचे विश्लेषण करू. जर यंत्रणा अपेक्षेप्रमाणे काम करत नसेल तर 27 ऑगस्टला लँडिंग करण्याचा प्रयत्न केला जाईल', असे नीलेश देसाई यांनी सांगितले.
रशियाचे लुना 25 अखेरच्या क्षणी क्रॅश झाले : 20 ऑगस्टला रशियाचे लुना 25 हे अंतराळयान लॅंडिंग दरम्यान शेवटच्या क्षणी क्रॅश झाले होते. यावर नीलेश देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. 'रशियाला अंतराळातील महासत्ता मानले जाते. मात्र त्यांचे लुना 25 क्रॅश झाले. त्यांच्याकडे प्रगत तंत्रज्ञान आहे, तरीही ते उतरण्यात अयशस्वी ठरले. त्यांनी दक्षिण ध्रुवावर जाण्याचा प्रयत्न केला होता. इस्रोनेही हे मिशन यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे', असे नीलेश देसाई म्हणाले.
हेही वाचा :
- चांद्रयानासाठी शेवटची १५ मिनिटे धोक्याची, जाणून घ्या २०१९ मध्ये काय झाले होते?
- Chandrayaan 3 : सोन्यापासून बनवलं 'चांद्रयान-3' चे मॉडेल; पाहा व्हिडिओ
- Chandrayaan 3 : चंद्रयान 3 चंद्रावरील दक्षिण ध्रूवावर उतरण्यास सज्ज, इस्रो ठरणार जगात अव्वल