प्रश्न : युद्धाबाबत तुमचं सध्याचं आकलन काय आहे?
उत्तर :आम्ही आता युद्धाच्या पाचव्या आठवड्यात आहोत. परिस्थिती खूप कठीण आहे. मला वाटत नाही की या प्रकारचा घेराव आपण यापूर्वी कधी पाहिला असेल. लेनिनग्राडच्या नाझींच्या वेढादरम्यान असं होतं की नाही हे मला माहित नाही. मात्र त्यांची परिस्थिती पॅलेस्टिनींच्या परिस्थितीपेक्षा खूपच चांगली होती. आज अंदाजे २.२ दशलक्ष पॅलेस्टिनी पाणी आणि इंधनाशिवाय जगत आहेत. इस्रायली आता निर्वासितांच्या आश्रयस्थानांवर आणि रुग्णालयांवर बॉम्बफेक करत आहेत. परिस्थिती रानटी असून ते हमासवर हल्ला करत असल्याचं सांगतायेत.
प्रश्न :तुम्ही भारताची प्रतिक्रिया कशी पाहता? संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही भारतानं शांततापूर्ण युद्धविरामाच्या प्रस्तावापासून स्वतःला दूर ठेवलं.
उत्तर : भारत किमान युद्धबंदीचं आवाहन करेल, अशी मला आतापर्यंत अपेक्षा होती. त्यांनी हमासचा निषेध केला, मात्र UNGA मध्ये भाग घेतला नाही. युद्धात १०,००० हून अधिक लोक आधीच मरण पावले आहेत. इस्रायलनं इमारती आणि रुग्णालयांवर हल्ले केले तेव्हा हजारो लोक मारले गेले. अजूनही हजारो लोक ढिगार्याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी आमच्याकडे साधनं नाहीत.
प्रश्न :आगामी काळात भारत शांतता निर्माण करणारा देश म्हणून उदयास येईल असं तुम्हाला वाटतं का?
उत्तर : मला अशी आशा आहे. भारतानं वार्ताहर म्हणून काम केलं तर ते चांगलं होईल. भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला एक महत्त्वाचा देश आहे. मला आशा आहे की ते (पंतप्रधान) दोन्ही बाजूंकडे एकाच दृष्टीकोनातून पाहतील आणि लहान मुलं आणि निष्पाप नागरिकांच्या हत्येचा निषेध करतील. इस्रायल हमासशी लढत नाही कारण ते पॅलेस्टिनी, प्रामाणिक लोक आणि नागरिक मारत आहेत.
प्रश्न : हे युद्ध नेमकं कशामुळे सुरू झालं?
उत्तर : याची अनेक कारणे आहेत. पॅलेस्टिनी ७५ वर्षांपासून या समस्यांना तोंड देत आहेत. आम्ही शांततेसाठी इस्रायलसोबत करार केले. आम्ही १९९३ मध्ये त्यांच्याशी शांतता करार केला (ओस्लो करार). आम्ही यित्झाक राबिनसोबत केलेल्या करारानुसार पॅलेस्टिनी स्वतंत्र राज्य १९९९ मध्ये अस्तित्वात यायला हवं होतं. परंतु सध्याचं सरकार आणि अतिरेकी नेत्यांनी राबिनची हत्या केली. तेव्हापासून, ते पॅलेस्टिनी जमीन ताब्यात घेऊन, अधिक वसाहती बांधून, अधिकाधिक स्थायिक आणून आणि पॅलेस्टिनी नागरिकांवर हल्ले करून ओस्लो करार आणि द्वि-राज्य उपाय नष्ट करत आहेत.