श्रीनगर - गेल्या वर्षी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या 'हाय वोल्टेज ड्रामा' नंतर त्याचा दुसरा अंक आता पुन्हा पाहायला मिळत आहे. काँग्रेसमध्ये पुन्हा बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तथापि, यावेळी रणांगण दिल्लीचे नसून जम्मूचे असेल. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोनिया गांधींना पत्र लिहिलेले 23 नेते पुन्हा एकदा जम्मूत एकत्र जमले आहेत. वास्तविक, जम्मू हे आझाद यांचे कार्यस्थळ राहिले आहे आणि पक्षातील बंडखोरीसाठी ही जागा पूर्णपणे योग्य मानली जाते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. गुलाम नबी आझाद यांना पक्षाकडून जी वागणूक दिली, त्यानेही काँग्रेसचे नेते दुखावले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.
जम्मूमध्ये शनिवारी काँग्रेसच्या जी 23 गटाची बैठक होत आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा, कपिल सिब्बल, राज बब्बर, विवेक तन्खा आणि गुलाम नबी आझाद यांचा समावेश आहे. याठिकाणी “सेव द आइडिया ऑफ इंडिया” ही मोहीम लाँच करण्यात येणार आहे. हा काँग्रेस पक्षाचा अधिकृत कार्यक्रम नाही. एकीकडे राहुल गांधी दक्षिणेच्या दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे बंडखोर नेत्यांची ही एकजूट काँग्रेस पक्षासाठी चांगले लक्षण नसल्याची चर्चा आहे. जी 23 गटाने जम्मू काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीच्या प्रमुखांना या शांती संमेलनात बोलावलेल नाही. यावरून हे स्पष्ट झाले आहे, की हे नेते पक्षाविरोधत बंड दर्शविण्यासाठी स्वतंत्र आघाडी करत आहेत.