खानकुल (पश्चिम बंगाल) - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्तेतील तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंडिकेट क्रमांक 1, तर अमित शाह सिंडिकेट क्रमांक 2 आहेत, असे त्या म्हणाल्या. अभिषेक, सुदीप आणि स्टालिन यांच्या मुलींच्या घरी केंद्रीय यंत्रणा पाठवल्या जात आहेत. तसेच भाजपा सलग पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत आहेत, असे दीदी म्हणाल्या. हावडामध्ये एका सभेला संबोधित करत होत्या.
भाजपा शेतकऱ्यांना पैसे देण्यासंदर्बात मोठ्या बढाया मारत आहे. मी केंद्र सरकारला लाभार्थ्यांची यादी पाठवली आहे. मात्र, त्यांनी अद्याप का पैसे पाठवले नाहीत, असा सवाल दीदींनी केला. गुजराती, यूपी आणि बिहारमधून गुंडाना पश्चिम बंगालमध्ये पाठवण्यात येत आहे. पश्चिम बंगालवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आम्ही बंगालला गुजरातसारखे बनू देणार नाही. भाजपा सांप्रदायिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे दीदी म्हणाल्या.