डब्लिन : भारत आणि आयर्लंड संघात दोन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा ( Ireland vs India 2nd T20 ) सामना मंगळवारी पार पडला. डब्लिन येथील विलेज स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात भारताने आयर्लंड संघावर चार धावांनी निसटता विजय ( India won by 4 runs ) मिळवला. त्याचबरोबर 2-0 ने मालिका खिश्यात घातली. या सामन्यात दीपक हुड्डाने शतक ठोकले, तर संजू सॅमसनने वादळी अर्धशतक लगावले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने हुडाचे शतक आणि संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या जोरावर 7 बाद 225 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ शेवटच्या षटकापर्यंत सामन्यात राहिला मात्र चार धावांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आयर्लंडने निर्धारित 20 षटकांत 221 धावाच करता आल्या.
शेवटच्या चेंडूवर त्यांना विजयासाठी 5 धावांची गरज -
प्रत्युत्तरात आयर्लंड देखील शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देत होता. शेवटच्या चेंडूवर त्यांना विजयासाठी 5 धावांची गरज होती, पण फलंदाज षटकार मारू शकला नाही. आयर्लंडचा संघ जेव्हा लक्ष्या पाठलाग करण्यासाठी मैदानात आला, तेव्हा त्याचे सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि अँडी बालबिर्नी यांनी संघाला चांगली सुरुवात दिली. दोघांनी अनुक्रमे 40 आणि 60 धावांचे योगदान दिले. त्यानंतर हॅरी टेक्टरने महत्वाच्या 39 धावा केल्या. जॉर्ज डॉकरेल आणि मार्क ऍडायर यांनी शेवटपर्यंत खिंड लढवली. या दोघांनी शेवटच्या षटकांमध्ये अनुक्रमे 34 आणि 23 धावा केल्या. या दोघांच्या शेवटच्या षटकातील योगदानामुळे सामन्याचा थरार शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचला.
दुसऱ्या विकेट्साठी विक्रमी 176 धावांची भागीदारी -
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने संजू सॅमसन आणि दीपक हुड्डाने दुसऱ्या विकेट्साठी शानदार 176 धावांची भागीदारी केली. ही 20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून केली गेलेली सर्वोच्च भागीदारी आहे. हुड्डा आणि सॅमसनच्या ( Deepak Hooda & Sanju Samson Partnership) जोडीने केएल राहुल आणि रोहित शर्मा या जोडीलाही मागे टाकले आहे. यापूर्वी भारताकडून टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च भागीदारी राहुल आणि रोहित जोडीच्या नावावर होती. त्यांनी 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 165 धावांची भागीदारी रचली होती. परंतु आता हुड्डा आणि सॅमसनने त्यांचा विक्रम मोडला आहे.
टी-20 शतक ठोकणारा दीपक भारताचा चौथा खेळाडू-
हुड्डाने या सामन्यात 57 चेंडू खेळले आणि 104 धावांची खेळी केली ( Deepak Hooda's century ). या धावा करण्यासाठी त्याने 9 चौकार आणि 6 षटकार ठोकले. तो भारतासाठी टी-20 सामन्यात शतक झलकावणार चौथा खेळाडू ठरला. या अगोदर सुरेश रैना, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी अशी कामगिरी केली आहे. त्याचबरोबर संजू सॅमसने देखील अवघ्या 42 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 77 धावांची वादळी खेळी केली. तो भारताकडून आयर्लंड विरुद्ध सर्वोच्च स्कोर नोंदवणार तिसरा खेळाडू ठरला.
गोलंदाजांमध्ये आयर्लंडसाठी मार्ग ऍडायरने चार षटकात 42 धावांत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. जोश ललितने चार षटकात 38 धावांत आणि क्रेग यंगने चार षटकात 35 धावांत प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. भारताकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमार (46), हर्षल पटेल (54), रवी बिश्नोई (41), उमरान मलिक (42) धावा देत या चौघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
हेही वाचा -India Vs England 5th Test : इंग्लडविरुद्ध होणाऱ्या निर्णायक सामन्यात कोण करणार, भारतीय संघाचे नेतृत्व?