हेदराबाद - ‘वाचक मंच’ या वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी आणि हैदराबादेतील वाचकांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सुरू केलेल्या प्रकल्पाचे दुसरे सत्र रविवार (१७ ऑक्टोबर) सायंकाळी मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कै. काशिनाथराव वैद्य (KVM hall) सभागृहात यशस्वीरित्या पार पडले. मराठी कट्टा-मराठी ग्रंथ संग्रहालय आणि भावतरंग क्रिएशन्स, हैदराबाद यांच्या संयुक्त विचारातून हा उपक्रम राबवण्यात आला होता.
यापूर्वी झालेल्या वाचक मंचच्या उद्घाटनाच्या सत्रात मराठी ग्रंथ संग्रहालयाचे दोन माजी अध्यक्ष भारत देगलूरकर आणि डॉ. विजय पांढरीपांडे तसेच प्रथितयश लेखिका आणि वक्त्या डॉ. शरयू देशपांडे आणि प्रिया जोशी हे ‘वाचक वक्ते’ होते.
दुसऱ्या सत्राच्या कार्यक्रमात तेलंगाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत आणि मराठी साहित्य परिषद तेलंगाणाच्या अध्यक्षा डॉ. विद्या देवधर हे मान्यवर वाचक वक्ते म्हणून उपस्थित होते. पहिल्या सत्राप्रमाणेच या दुसऱ्या सत्रातही श्रोत्यांनी प्रत्यक्ष आणि ऑनलाई अशी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
दुसऱ्या सत्राच्या कार्यक्रमाची सुरेल सुरुवात मैथिली पत्की यांच्या सुश्राव्य सरस्वती वंदनेने झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मराठी ग्रंथ संग्रहालयाचे कार्यवाह सतीश देशपांडे यांनी आपल्या प्रास्ताविकात वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी ग्रंथालयाकडून करण्यात येणाऱ्या विविध प्रयत्नांचा मागोवा घेतला. दिवाळी अंक योजना २०२१ लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी सभागृहास दिली.
वाचक-वक्ते महेश भागवत यांनी १९३९ साली प्रकाशित झालेल्या विश्राम बेडेकर यांच्या ‘रणांगण’ या कादंबरीबाबत अत्यंत ओघवत्या भाषेत माहितीपूर्ण विवेचन केले. त्या काळची द्वितीय महायुद्धजनक परिस्थिती आणि तिचा कादंबरीच्या कथानकाशी असलेला संबंध भागवत यांनी स्पष्ट केला. मुद्देसूद विवेचन, संक्षिप्त कथानिवेदन, पात्रांचा परिचय आणि सांगोपांग अभ्यास यांच्या साहाय्याने त्यांनी कादंबरीचा गाभा उकलून दाखवला. या कादंबरीची लेखनतंत्रात्मक आणि संज्ञाप्रवाहविषयक चर्चाही त्यांनी केली. आजच्या काळातही टिकून असलेले या महान कादंबरीचे औचित्य त्यांच्या भाषणातून दृ्ग्गोचर झाले.
हेही वाचा -मराठमोळे IPS महेश भागवत आणि समविचारी सहकाऱ्यांचे अनोखे विद्यादान; मार्गदर्शन केलेले 131 विद्यार्थी UPSC उत्तीर्ण
वाचक-वक्त्या डॉ. विद्या देवधर यांनी सरस्वती सन्मान प्राप्त शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीचे कथानक प्रभावी भाषणाद्वारे श्रोत्यांसमोर उभे केले. केवळ दलित साहित्यातच नव्हे तर समस्त मराठी साहित्य जगतात या कादंबरीला आणि तिच्या लेखकाच्या सर्वसमावेशक भूमिकेला आगळे स्थान का आहे याचा उहापोह त्यांनी केला. कादंबरीच्या कथानकातील काही हृदयद्रावक प्रसंगही डॉ. देवधर यांनी मांडले आणि त्या प्रसंगांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रयत्नांची गरज स्पष्ट केली. त्यांच्या या तळमळीच्या वक्तृत्त्वामध्ये श्रोत्यांना सामाजिक भान आणण्याचे सामर्थ्य होते.
त्यानंतर झालेल्या चर्चेमध्ये महेश भागवत यांच्या पत्नी सुनिता भागवत (IFS, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक, तेलंगाणा राज्य) यांनी वाचन संस्कृती आणि तिच्या संवर्धनाची गरज विशद करून वाचक मंचच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि मराठीसोबतच इतर भाषांमधील पुस्तकांचा परिचय अशाच पद्धतीने करून देण्यात यावा असा आग्रह धरला.
यानंतर मुक्त प्रतिक्रिया सत्रामध्ये महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष विवेक देशपांडे आणि उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी वाचन संस्कृती विकासासाठी अगदी नजीकच्या काळात प्रत्यक्ष कार्यक्रम हाती घेण्याचे आश्वासन दिले. हा अर्थातच वाचक मंचच्या चळवळीस मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणावा लागेल.
याप्रसंगी 'रंगधारा - द थिएटर ग्रुपचे' संस्थापक भास्कर शेवाळकर सर, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ मधुसूदन जोशी, डॉ. नयना जोशी आदी मान्यवर श्रोत्यांनी कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. तसेच या व्यासपीठावर जास्तीत जास्त प्रमाणात तरुणाईला संधी द्यावी आणि नव्या पिढीला वाचनाची आवड निर्माण करण्यात योगदान द्यावे असे आवाहन केले.
या आवाहनाला प्रतिसाद म्हणून भावतरंग क्रिएशन्सचे अध्यक्ष प्रकाश तुळजापुरकर यांनी वाचक मंचाच्या यापुढील कार्यक्रमांमध्ये या सर्व सूचनांचा विचार करून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
युवाप्रतिनिधी म्हणून मुक्ता धर्म पाटील यांनी उगवत्या पिढीत वाचनाची आवड रुजवण्यासाठी जुन्या पिढीच्या योगदानाची गरज नमूद केली. उपस्थितांपैकी अनेक जणांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आणि उपक्रमाचे कौतुक केले. रणांगण आणि सनातन या कादंबऱ्या आवर्जून वाचण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली हे या सत्राचे फलित होते.
हेही वाचा -दक्षिणेतील 'द रियल सिंघम' मानव तस्करांचा कर्दनकाळ, या मराठमोळ्या अधिकाऱ्याचा अमेरिकेत डंका'
कार्यक्रमाचे खुमासदार सूत्र संचालन माधव चौसाळकर यांनी केले. भावतरंग क्रिएशन्सचे चिटणीस विजय नाईक यांनी महेश भागवत यांची तर मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यकारी सभासद योगिनी फळणीकर यांनी डॉ. विद्या देवधर यांची ओळख करून दिली. तसेच भावतरंग क्रिएशन्सचे उपाध्यक्ष प्रकाश धर्म यांनी वाचक वक्त्यांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.