नवी दिल्ली : दरवर्षी २१ जून हा दिवस विश्व योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सलग दुसऱ्या वर्षी हा योग दिवस कोरोना महामारीमध्ये येतो आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी सकाळी साडेसहा वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत.
योग फॉर वेलनेस..
यावर्षी आपण सातवा योग दिवस साजरा करणार आहोत. दरवर्षी या योग दिनासाठी एक विशेष विषय (थीम) नेमण्यात येतो. यावर्षीच्या योग दिनाचा विषय आहे, 'योग फॉर वेलनेस'. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा विषय निवडण्यात आला आहे. यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमामधून पंतप्रधान सकाळी साडेसहा वाजता देशाला संबोधित करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
योग कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण..
उद्या (सोमवार) दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर सकाळी साडेसहा वाजेपासून योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. या कार्यक्रमात आयुष राज्यमंत्री किरेन रिजीजूदेखील संबोधित करणार आहेत. यासोबतच, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेमार्फत करण्यात येणाऱ्या योग प्रात्यक्षिकांचेही थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
४५ मिनिटे चालणार योगाभ्यास..
योग दिनाच्या पार्श्वभूमीवर काही योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पंतप्रधान मोदींचे संबोधन सात वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर सात वाजेपासून पुढे ४५ मिनिटे हा कार्यक्रम चालणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतील. मात्र फिजिकल डिस्टन्सिंगची खबरदारी घेण्यात येणार आहे, असे आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले.