हैदराबाद : आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा दरवर्षी '8 मार्च' ला साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांचा प्रचार करणे आणि महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करुन देणे, असा उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या हक्क चळवळीचा एक केंद्रबिंदू आहे. जो लैंगिक समानता, पुनरुत्पादक अधिकार आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या समस्यांकडे लक्ष वेधतो. याशिवाय, आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक यशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो; तसेच स्त्रियांबद्दल आदर, कौतुक आणि प्रेम दर्शवितो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन एका विशिष्ट थीमवर आधारित असतो.
दिवसाचा उद्देश :आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यामागील उद्देश हा आहे की, महिलांना देखील सामान्य नागरिकांना दिले जाणारे सर्व अधिकार मिळावेत. महिला आणि सामान्य नागरिकांमधील भेदभाव नष्ट व्हावा या उद्देशातून हा दिवस साजरा होऊ लागला.
दिनाचा इतिहास : संयुक्त राष्ट्र संघाने ८ मार्च १९७५ रोजी महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली, परंतु त्याआधी १९०९ सालीच तो साजरा करण्यात करण्यात आला होता. 1909 साली अमेरिकेत पहिल्यांदा 28 फेब्रुवारीला महिला दिन साजरा करण्यात आला होता. अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने न्यूयॉर्कमध्ये 1908 च्या गारमेंट कामगारांच्या संपाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस निवडला. त्याचवेळी पहिल्यांदाच, 28 फेब्रुवारी रोजी महिला दिन साजरा करताना, रशियन महिलांनी पहिल्या महायुद्धाचा निषेध नोंदवला. तर 1917 मध्ये शांततेच्या मागणीसाठी रशियन महिला संपावर गेल्या. फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी संप सुरू झाला. हा ऐतिहासिक संप होता आणि रशियाच्या झारने सत्ता सोडली तेव्हा, तेथील अंतरिम सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला.