नवी दिल्ली - आज देशातील अनेक शहरे प्लास्टिकच्या विळख्यात अडकली आहे. प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक असून, आपण मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करत आहोत. प्लास्टिकच्या पिशव्यांचा अनावश्यक वापर करून मानवी आरोग्याशी खेळले जात आहे. आज 'आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस' आहे. हा दिवस प्लास्टिकसंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जाहीर करण्यात आला होता. परंतु आज वाढत्या प्रदूषणाबद्दल आपण किती जागरूक आहोत हा प्रश्न कायम आहे.
प्लास्टिकमुळे होणारे नुकसान, त्याचा वाढता वापर आणि दुष्परिणामांविषयी लोकांमध्य जागरूकता निर्माण करण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक बॅग फ्री डे' 3 जुलै 2009 पासून संपूर्ण जगात साजरा करण्यात येत आहे. आजही मोठ्या बाजारांपासून ते भाजी मार्केटपर्यंत वस्तू प्लास्टिकमध्ये उघडपणे विकल्या जात आहेत. दिवसेंदिवस समुद्रात वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे समुद्री प्राण्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.