हैद्राबाद :जगातील सर्वात प्रिय नातेसंबंधांपैकी एक नाते म्हणजे मैत्री आहे. मैत्री कधीच रक्ताच्या नात्यावर अवलंबून नसते, ती फक्त विश्वास आणि प्रेम या दोन गोष्टींवर अवलंबून असते. मैत्री हे एक सुंदर नाते आहे, त्याला जात, वय, रंग यांचे बंधन नसते. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन दरवर्षी 30 जुलै रोजी साजरा केला जातो. मैत्री साजरी करणे तसेच नवीन लोकांना भेटणे आणि मित्र बनवणे या कल्पनेला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा उद्देश आहे. 2011 पासून 30 जुलैला आंतरराष्ट्री मैत्री दिन साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय मैत्री दिन :2011 मध्ये, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत मैत्री, संस्कृती, समुदाय, देश आणि लोक यांच्यातील संबंध साजरे करण्यासाठी 30 जुलैला आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून घोषित केले. तरुण हे देशाचे भविष्य आहेत. हा दिवस त्यांना विविधतेचा आदर करण्यास आणि प्रत्येक गोष्टीत एकता शोधण्यास शिकवण्याच्या महत्त्वावर भर देतो, असा यामागे हेतू होता. या दिवशी, सरकारी संस्था, खाजगी संस्था आणि इतर संस्था विविध समुदाय आणि संस्कृतींमध्ये संवाद सुरू करण्यासाठी कार्यक्रम, चर्चासत्रे आणि उपक्रम आयोजित करतात. एकत्र येण्यासाठी आणि सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.