मुंबई महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्यामार्फत महाराष्ट्र राज्यातील काही विशिष्ट ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके, जागा संरक्षित केल्या जातात. अशा ठिकाणांना महाराष्ट्रातील राज्य संरक्षित स्मारके म्हटले जाते. या राज्य संरक्षित स्मारकांच्या देखभालीचे आणि संरक्षणाचे काम महाराष्ट्र शासनाचे पुरातत्त्व खाते करते. त्यांची माहिती आपण घेणार ( National Monuments ) आहोत.
दामडी मशीद दामडी मशीद ( Damdi Masjid ) अहमदनगर कॅन्टोन्मेंटमध्ये आहे. मोठ्या दगडांवर केलेल्या कोरीव कामांमुळे अनेक पर्यटक तिथे भेट देतात. 1567 मध्ये साहिर खान याने अहमदनगर किल्ल्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या योगदानातून ही मशीद बांधली. ही मशीद निजामशाही काळातील एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. ती चांगली रचना आणि उत्कृष्ट कारागिरीसाठी ओळखली जाते. विशेषतः कोरीव काम, प्रार्थना हॉल मशीदीवरील छत, अष्टकोनी खांब, तीन कमानी , मिनार ही तिथली आकर्षक ठिकाणे आहेत.
शनिवार वाडा शनिवार वाडा ( Shaniwar Wada ) ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.च्या १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते. शनिवार वाड्याला १७ जून १९१९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच आहे आणि चारही बाजूने एकूण ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत आहे. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून रुंदी १४ फूट आहे. हा सर्वांत मोठा दरवाजा आहे.
दौलताबाद किल्लादौलताबाद किल्ला ( Daulatabad Fort ) ज्याला देवगिरी किल्ला असेही म्हणतात. हा औरंगाबाद शहरात आहे. देवगिरी गावात स्थित एक ऐतिहासिक तटबंदी आहे. ही यादव घराण्याची राजधानी होती. थोड्या काळासाठी दिल्ली सल्तनतची राजधानी (1327-1334), आणि नंतर अहमदनगर सल्तनतची (1499-1636) दुय्यम राजधानी होती.6व्या शतकात सध्याच्या संभाजी नगराजवळ एक महत्त्वाचे शहर म्हणून उदयास आले होते. दौलताबाद किल्ला त्रिकोणी आकारात आहे. 1187 च्या आसपास पहिला यादव राजा भिल्लमा याने हा किल्ला बांधला होता.1308 मध्ये, हे शहर दिल्ली सल्तनतच्या सुलतान अलाउद्दीन खल्जीने जोडले होते, 1327 मध्ये, दिल्ली सल्तनतच्या सुलतान मुहम्मद बिन तुघलकने शहराचे नाव देवगिरीवरून दौलताबाद केले आणि आपली शाही राजधानी दिल्लीहून शहरात हलवली. दिल्लीतील सैन्याला दौलताबाद येथे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्याचा आदेश दिले होते.
औरंगजेबाची कबरअहमदनगरमध्ये 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला. मृत्यूनंतर आपली कबर ( Aurangzebs Tomb ) ही आपले गुरू सैय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारीच असावी, असे औरंगजेबाने मृत्यूपत्रात लिहून ठेवले होते. त्यात त्याने अगदी स्पष्ट लिहिले होते की, माझे गुरू हजरत ख्वाजा झैनुद्दीन सिराजी यांना औरंगजेब आपले गुरु मानायचा. ही कबर कशी असावी, याविषयीही औरंगजेबाने मृत्यूपत्रात सविस्तर लिहिले होते. मी जे पैसे स्वत: कमावले आहेत, त्यात जितकं होईल तेवढ्यातच माझी कबर बांधा. त्यावर एक सब्जाचं छोटंसं रोप लावा. एवढीच औरंगजेबाची इच्छा होती. त्यानुसार त्याची खुलताबादेत कबर बांधण्यात आली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने आझमशाहने ही कबर बांधली. औरंगजेब गुरू मानत असलेल्या झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे. पूर्वी या कबरीवर वरच्या बाजूला संरक्षित कवच देण्यात आले होते. त्यानंतर मग 1904-05 च्या दरम्यान लॉर्ड कर्झन आले. आणि त्यांने तिथं मार्बल ग्रिल बांधून कबरीची सजावट केली.
लोहगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे ( Lohgad Fort ). भारत सरकारने या किल्ल्याला २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. इतिहास लोहगड किल्ला हा अती मजबूत, बुलंद आणि दुर्जेदार आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, सातवाहन, चालुक्य,यादव या राजवटी या लोहगड किल्ल्याने पाहिल्या आहेत. इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड–विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला.इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकर यांनी लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंग्ऱ्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना गड रिकामा करायचा हूकुम सोडला अनिच्छेनेच मराठे मागे फिरले. गडावर चढतांना सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. गणेश दरवाजा ह्याच्याच डाव्या उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटिलकी देण्यात आली होती.येथे आतील बाजूस शिलालेख आहेत. नारायण दरवाजा हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येईल.
बीबी का मकबरा बीबी का मकबरा ( Bibi Ka Maqbara ) गेल्या सतराव्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबाने बांधला होता. इतिहासकारांच्या मते मुघल सम्राट औरंगजेबाने त्याची पत्नी दिलरस बानो बेगम हिच्या स्मरणार्थ ही कबर बांधली होती. त्यांना राबिया-उद-दौरानी या नावानेही ओळखले जात होते. ते ताजमहालच्या आकारावर बांधले गेले. 'बीबी का मकबरा' हा देशाचा दुसरा ताजमहाल म्हणून ओळखला जातो. ही समाधी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे आहे. ती बांधण्यासाठी 700,000 रुपये खर्च आला होता. तर ताजमहाल बांधण्यासाठी 3.20 कोटी रुपये खर्च आला होता. यामुळेच बीबी का मकबरा याला 'गरिबांचा ताजमहाल' असेही म्हणतात. आग्राचा ताजमहाल शुद्ध पांढऱ्या संगमरवरी बांधण्यात आला होता, तर बीबी का मकबराचा मुख्य घुमट संगमरवराचा होता. उर्वरित समाधी प्लॅस्टरने बनविली आहे, जेणेकरून ती संगमरवरी दिसते. या थडग्याचा मुख्य घुमट ताजमहालच्या मुख्य घुमटापेक्षा लहान आहे.